

Festivals came but no supply of Anandacha Shidha
पेठपिंपळगाव, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी सणासुदीचा काळ म्हणजे आनंदाचा श्वास असतो. पण या आनंदात महत्वाची भूमिका बजावणारा शासनाचा 'आनंदाचा शिधा' दीड वर्षांपासून गायब झालेला आहे. यंदाही गणेशोत्सव, नवरात्र, दसरा सण संपले तरी गरीबांच्या वाट्याला आनंदाचा शिधा आलेला नाही. त्यामुळे यावर्षीही सण साजरा करण्याच्या आशा मावळल्या.
पूर्वी सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत सणासुदीच्या काळात सरकारकडून गरीबांना रेशन दुकानातून अत्यल्प दरात साखर, डाळ, रवा, तेल, हरभरा डाळ, मैदा आदी जीवनावश्यक वस्तू मिळायच्या. शंभर रुपयांत एक आनंदाचे पॅकेज मिळायचे. परंतु सध्या रेशन दुकानांत फक्त २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ यांचाच पुरवठा होत आहे. काही ठिकाणी ज्वारी मिळते, पण बाकी सर्व वस्तू गायब आहेत.
सध्या बाज-ारात डाळ, तेल, रवा, साखरेचे दर गगनाला भिडले. परिणामी गरीबांना या वस्तू बाज- ारातून घेणे परवडणारे राहिलेले नाही. पूर्वी शिधा मिळत असल्याने सण साजरे करता येत होते. आता मात्र सणच ओसरून जात आहेत. गरीब मोलमजुरी करून कसेबसे पोट भरतोय, त्यात सणाच्या काळातही आनंद न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. गतवर्षी आनंदाचा शिधा मिळायचा, तेव्हा सण गोड व्हायचे. यंदा अनेक सण गेले तरी काहीच मिळाले नाही. दिवाळीला तरी सरकार काही देईल का? असा सवाल शिधा धारकांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक रेशन दुकानांतर्फे मिळणाऱ्या माहितीनुसार वरिष्ठ पातळीवरून कोणताही शिधा येत नसल्याचे सांगितले जात आहे. ना कोणते पत्रक आले, ना कोणते आदेश. त्यामुळे यंदा दिवाळीत आनंदाचा शिधा मिळणार का? हेही अनिश्चित आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाशी संपर्क साधून माहिती मागविण्याचा प्रयत्न केला.