

Fatal accident near Umri Fata; Car collides with tipper, Sheleke couple killed
परभणी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बोरवंड रस्त्यावरील उमरी फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला कारने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात परभणी शहरातील शेळके दाम्पत्याचा मृत्यू झाला. रोहित दिलीपराव शेळके (वय ३८) आणि त्यांच्या पत्नी माधवी रोहित शेळके (वय ३५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. या अपघातात त्यांची मुलगी रितीक्षा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
परभणी शहरातील मध्यवस्तीतील गांधी पार्क परिसरात राहणारे रोहित शेळके हे मित्रपरिवारात बंटी या नावाने परिचित होते. रोहित आणि माधवी शेळके हे मुलगी रितीक्षासह ब्रह्मपुरी येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते रात्री कारने परभणीकडे परतत होते. उमरी फाट्याजवळ आल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परवर त्यांची कार मागील बाजूने आदळली. धडक एवढी जोरदार होती की कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला.
अपघाताचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदतकार्य केले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रोहित शेळके आणि माधवी शेळके यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. शेळके कुटुंबीयांसाठी हा अपघात काळीज पिळवटून टाकणारा ठरला. रात्री कुटुंबासह परतत असताना घडलेल्या या अपघातात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशेष म्हणजे मुलगी रितीक्षा गंभीर जखमी असल्याने तिच्या प्रकृतीबाबत नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये चिंतेचे वातावरण आहे. रोहित शेळके यांच्या आकस्मिक निधनाची बातमी परभणीत समजताच गांधी पार्क परिसरासह शहरातील अनेक नागरिकांना धक्का बसला. एकाच अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शेळके दाम्पत्यावर रविवारी दुपारी बारा वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बोरवंड रस्त्यावरील उमरी फाट्याजवळ रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहने उभी करण्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.