Cyber Fraud : मोहोळमध्ये सायबर भामट्यांचा हायटेक दरोडा!

पार्सलच्या बहाण्याने APK फाईल पाठवून मोबाईल हॅक; महिलेच्या खात्यातून ९० हजार रुपये लंपास
Cyber Fraud
Cyber Fraud : मोहोळमध्ये सायबर भामट्यांचा हायटेक दरोडा!file photo
Published on: 
Updated on: 

High-tech heist by cyber fraudsters in Mohol!

मोहोळ शहर : पुढारी वृतसेवा मोहोळ शहरात सायबर गुन्हेगारांनी पार्सलच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पार्सलची माहिती देण्याच्या बहाण्याने महिलेच्या मोबाईलवर APK फाईल पाठवून मोबाईल हॅक करण्यात आल्याचा संशय आहे. या माध्यमातून महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ९० हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. या प्रकरणी संगीता उत्तम राठोड (वय ३५, रा. महाप्रज्ञा निवासीस्थान, न्यायालय परिसर, मोहोळ) यांच्या तक्रारीवरून मोहोळ पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Fraud
Sharadiya Navratri 2026 : आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ७ राशींना मिळू शकतो लाभ, तयार होत आहेत ४ शुभ योग

औषधांच्या पार्सलची वाट पाहत असताना फसवणूक

संगीता राठोड यांच्या पतीच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांच्या गोळ्या छत्रपती संभाजीनगर येथून मागविण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या औषधांचे पार्सल घरी येण्याची वाट पाहत होत्या. १ ऑक्टोबर २०२६ रोजी पार्सल येणे अपेक्षित होते. मात्र, घर बंद असल्याने पार्सल परत गेल्याचे त्यांना सांगण्यात आले.

त्यानंतर पार्सलसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी त्यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. यावेळी पार्सलचा ट्रॅकिंग क्रमांक देण्याच्या बहाण्याने त्यांच्या मोबाईलवर एक फाईल पाठविण्यात आली. पार्सलची माहिती मिळविण्यासाठी ही फाईल असल्याचे भासविण्यात आल्याने त्यांनी ती डाउनलोड केली.

मात्र, फाईल डाउनलोड केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे समोर आले. सायबर गुन्हेगारांनी मोबाईलचा गैरवापर करून खात्यातील रक्कम परस्पर वळती केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारात ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीतून समोर आले आहे.

Cyber Fraud
Mohanlal Fitness : ६६ व्या वर्षीही १०० किलो वजन उचलण्याची ताकद! अभिनेता मोहनलाल यांच्या फिटनेसचं गुपित काय?

दोन रुपयांच्या शुल्काच्या बहाण्यानेही जाळे

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या जात आहेत. पार्सल अडकल्याचे सांगणे, पत्ता चुकीचा असल्याचे भासविणे किंवा पार्सल पुन्हा पाठविण्यासाठी दोन रुपये सेवा शुल्क भरण्यास सांगणे, अशा बहाण्यांचा वापर केला जातो.

यासाठी नागरिकांना संशयास्पद लिंक किंवा APK फाईल पाठविली जाते. अशा फाईलमुळे मोबाईलमधील माहिती, संदेश आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित तपशील धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे अगदी किरकोळ रकमेचे शुल्क भरण्यास सांगितले तरी संदेशाची सत्यता तपासल्याशिवाय कोणतीही कृती करू नये.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

अनोळखी APK फाईल डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका.

पार्सलच्या नावाने आलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.

कुरिअर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा अधिकृत ग्राहकसेवा क्रमांकावरून पार्सलची खात्री करा.

बँकेचे ओटीपी, यूपीआय पिन आणि पासवर्ड कोणालाही सांगू नका.

मोबाईलमध्ये अनोळखी अॅप इन्स्टॉल करण्यास किंवा अनावश्यक परवानग्या देण्यास टाळा.

आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवा.

सायबर सुरक्षेबाबत सतर्कता गरजेची

मोबाईलवर येणारा प्रत्येक संदेश खरा असेलच असे नाही. पार्सल, औषधे, वीजबिल किंवा बँक व्यवहारांच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे कोणतीही फाईल डाउनलोड करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे आवश्यक आहे.

या प्रकरणी मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news