

Experiment of an experimental farmer from Daithana
परभणी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दैठणा येथील एका प्रयो-गशील शेतकऱ्याला सहा महिन्यांचे पीक असलेल्या मिरची उत्पादनातून लाखो रुपयांची आर्थिक मदत होत आहे. या शेतकऱ्यासाठी आजघडीला मिरचीची लाख मोलाची साथ मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले.
परभणी तालुक्यातील दैठणा येथील शेतकरी अॅड. चंद्रकांत कच्छवे यांनी प्रथम २०१८ ला साध्या पद्धतीने बेडशिवाय मिरचीची लागवड केली. परंतु त्यावर रोगाचा प्रादुर्भाव होऊन एक महिन्याच्या आतच तोडा संपला. २०१९ ला बेडवर मिरची लावल्यानंतर दोन ते तीन महिने तोडा चालला. दोन वर्षाच्या अनुभवावरून मिरची लागवडीसाठी आपली पद्धत चुकत आल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधीत शेतकऱ्याने २०२० साली लॉकडाउनच्या काळामध्ये मिरची लागवडीवर लक्ष्य केंद्रीत केले आणि त्यांना या लागवडीतुन लाखो रुपयांची मदत होऊ लागली.
अॅड. चंद्रकांत कच्छवे यांनी यंदा ९ मे ला १ एकर मिरचीची लागवड केली. कच्छवे यांना एक एकरमधून ३५ टन मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे. सद्यस्थितीत मार्केट यार्डात ८० रुपये प्रति किलोने तर १०० रुपये किलोने किरकोळ विक्री होत आहे. पुढील महिन्याभरापर्यंत भाव चांगला राहून पुढे मिरची ३० रु. किलोपर्यंत खाली आली तरीही कच्छवे यांना सहा महिन्यांमध्ये मिरचीच्या माध्यमातून १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. मागील ८ वर्षांपासून ते मिरचीची लागवड करत वेळोवेळी येणाऱ्या नवीन अनुभवातून मिरची लागवड तंत्रामध्ये सुधारणा करत आहेत.
मिरची लागवडीसाठी लागवडपूर्व मशागत केल्यानंतर बेड तयार करणे, बेडला बेसल डोस देणे तद्नंतर मलचिंग अंथरणे व रोपे लावणे या पद्धतीने ते मिरचीची लागवड करतात. ६० दिवसांच्या नंतर मिरचीचा तोडा सुरू होतो. अति उष्ण तापमानात मिरचीची लागवड केली तरी मिरची येते असे चंद्रकांत कच्छवे यांनी सांगीतले. मे महिन्यापासून झालेला पाऊस मिरची लागवड वातावरणासाठी पोषक बनत गेल्याचे चंद्रकांत कच्छवे यांनी सांगितले.
मिरची लागवडीनंतर १९.१९..१२.६१.० ही विद्राव्य खते ठिबकच्या माध्यमातून दिल्याशिवाय मिरची सुधारत नाही. ७-८ दिवसाला मिरचीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचाही वापर करावा लागतो असे चंद्रकांत कच्छवे यांनी सांगितले. मिरची ही दुग्धव्यवसाया सारखेच खेळते भांडवल देणारे पीक असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने दहा गुंठे तरी मिरची लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.