

Nanded youth suspicious death
पूर्णा: पूर्णा शहरातील रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या इंडियन लॉजमध्ये मुक्कामी थांबलेल्या एकाचा मृतदेह आढळला. ही घटना आज (दि.१७) दुपारी उघडकीस आली. आनंद वासुदेवराव विष्णुपूरीकर (वय ४८, रा. विष्णुपरी, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे. पूर्णा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, लॉजमध्ये आनंद विष्णुपुरीकर रुम घेऊन मुक्कामी थांबला होता. दि. १६ जुलैरोजी सायंकाळी ६. ३० वाजता तो नांदेड येथून आल्याची नोंद आढळली आहे. आज चेक आऊट वेळेपर्यंत त्याने आपल्या रुमचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे लॉज मॅनेजर यांनी दुपारी १२.३० च्या सुमारास दरवाजा ठोठावला. आतून कोणताच प्रतिसाद न आल्याने शेवटी दरवाजा तोडला. त्यावेळी आनंद पलंगावरुन खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आला.
या घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, फौजदार प्रकाश इंगोले, प्रल्हाद घोळवे, दत्ता कुंभारगावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पूर्णा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. लॉजच्या रेकॉर्ड बुक नोंद आणि आधार कार्डवरुन मृताच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे उत्तरीय तपासणीच्या अहवालातून स्पष्ट होणार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे करत आहे.