Parbhani farmer fraud : शेतकऱ्यांची साडेपाच कोटींची फसवणूक; दोन व्यापारी पसार

हळद, गहू, सोयाबीन, तूर व हरभरा खरेदीतून लुटले; पोलिसांत गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

पूर्णा/एरंडेश्वर : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर परिसरातील शेतकऱ्यांची तब्बल ५ कोटी ५६ लाख ४९ हजार ३०० रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या शेतमालाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली, मात्र त्याचे पैसे न देता गाव सोडून फरार झाल्याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात दोन व्यापाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, कृषीमाल व्यापारातील व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी रामप्रसाद साहेबराव काळे (रा. एरंडेश्वर, ता. पूर्णा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख हमीद ऊर्फ अमित शेख सरू व शेख सरू शेख बालेसाब, दोघेही रा. एरंडेश्वर, ता. पूर्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२३ ते ३० मे २०२६ या कालावधीत झिरोफाटा येथील 'जय किसान ट्रेडिंग कंपनी' या आडत दुकानातून आरोपींनी शेतकऱ्यांशी विश्वासाचे संबंध निर्माण केले. त्यानंतर त्यांनी हळद, सोयाबीन, हरभरा, गहू व तूर यांसह विविध कृषीमालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली.

Crime News
Jalgaon Crime | धावत्या लक्झरी बसमधून २५ लाखांची बॅग लंपास करणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

व्यवहाराच्या वेळी मालाची रक्कम लवकरच अदा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वासाने आपला माल त्यांच्या ताब्यात दिला. मात्र, मालाची रक्कम देण्याची वेळ येताच आरोपींनी वारंवार टाळाटाळ सुरू केली. सुरुवातीला काही दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विविध कारणे सांगून वेळकाढूपणा केला.

अखेर व्यापारी गाव सोडून निघून गेले आणि त्यांचे मोबाईल फोनही बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादीनुसार, आरोपींनी १,०९६ क्विंटल हळद (१ कोटी ७५ लाख ३६ हजार रुपये), २,०५६ क्विंटल हरभरा (१ कोटी १९ लाख २४ हजार ८०० रुपये), ३,६३० क्विंटल सोयाबीन (२ कोटी ५७ लाख ७३ हजार रुपये), ५७ क्विंटल गहू (१ लाख ४२ हजार ५०० रुपये) आणि ३९ क्विंटल तूर (२ लाख ७३ हजार रुपये) असा एकूण ५ कोटी ५६ लाख ४९ हजार ३०० रुपयांचा कृषीमाल खरेदी करून त्याची रक्कम न दिल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१६(२), ३१६ (५) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. फिर्यादीने शनिवारी (दि.१८) पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पहाटे २.११ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याची नोंद सहायक पोलिस निरीक्षक सिंगणवाड यांनी केली असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Crime News
Buldhana Crime | १६ लाखांच्या हरभऱ्यासह फरार ट्रक चालकासह पाच जण जेरबंद; १८.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या असून, या प्रकरणात आणखी काही शेतकरी पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या कोट्यवधींच्या फसवणुकीमुळे एरंडेश्वर व परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. आरोपींना तातडीने अटक करून शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून द्यावेत, तसेच या व्यवहारात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news