Jalgaon Crime | धावत्या लक्झरी बसमधून २५ लाखांची बॅग लंपास करणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Jalgaon Crime | धावत्या लक्झरी बसमधून २५ लाखांची बॅग लंपास करणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Published on
Updated on

जळगाव : धावत्या लक्झरी बसमधून २५ लाख रुपये रोख असलेली बॅग चोरून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या एका दिवसात अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली २५ लाख रुपयांची संपूर्ण रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किमतीची मारुती डिझायर कार जप्त करण्यात आली असून, एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी नितीन पुरुषोत्तम वाणी (रा. कासार गल्ली, पारोळा) हे जळगावातील सराफ व्यावसायिक प्रफुल्ल भागचंद सुराणा यांच्या वतीने कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी २५ लाख रुपये रोख घेऊन 'हरे कृष्णा ट्रॅव्हल्स'च्या बसने निघाले होते. फर्दापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील एका हॉटेलवर बस जेवणासाठी थांबल्यानंतर वाणी जेवण्यासाठी खाली उतरले. परत आल्यानंतर बसमध्ये ठेवलेली रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार सोनू उर्फ राम भगवान सरवन याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी शेख रहमान शेख निसार, सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे आणि दशरथ सुरेश चौधरी यांनाही अटक केली.

तपासात शेख रहमान याने गुन्ह्यासाठी स्वतःची मारुती डिझायर एमएच- ४७-सी-७८७७उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून चोरीची २५ लाख रुपयांची संपूर्ण रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

मुख्य आरोपी सोनू उर्फ राम भगवान सरवन याच्याविरुद्ध जळगाव शहर, शनिपेठ आणि भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, चोरी, घरफोडी, मारहाण, सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ला आदी स्वरूपाचे अनेक गुन्हे पूर्वीपासून दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.

जळगाव जिल्ह्यातील इतर गुन्हे वृत्त

भडगावात बॅक हिसकावणाऱ्या पाच जणांना अटक

भडगाव शहरातील भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडील रोकड असलेली बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी यश हिरामण हटकर (रा. शिवनेरी गेट, भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीकडील सुमारे ५१ हजार ५६० रुपयांची रोकड असलेली बॅग अज्ञात आरोपींनी हिसकावून नेली होती.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासात भारत फायनान्स कंपनीत पूर्वी काम करणारा उदय छोटू गायकवाड याला कंपनीतील रोकड वाहतुकीची संपूर्ण माहिती असल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदारांसह गुन्ह्याची कबुली दिली. आधीच कट रचून कंपनीतून रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यावर पाळत ठेवली होती. ९ जुलै रोजी सायंकाळी भडगाव येथे दोन मोटारसायकलींच्या साहाय्याने आरोपींनी बॅग हिसकावून पलायन केल्याचे उघड झाले. या प्रकरणी उदय छोटू गायकवाड (रा. अनकवाडी, जि. धुळे)अनिल दिलीप पाटील (रा. पळासखेडा, ता. भडगाव)विशाल मधुकर गांगुर्डे (रा. पूर्वीपाडा, जि. धुळे)निलेश अण्णा पवार (रा. अनकवाडी, जि. धुळे)योगेश प्रकाश पवार (रा. अनकवाडी, जि. धुळे) यांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील सागर हिम्मत पाटील (रा. पळासखेडा) आणि हर्षल चांगदेव अहिरे (रा. येवला, जि. नाशिक) हे आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.पोलीसांनी आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल जप्त केली आहे. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे

जबरी चोरीतील मोबाईल हस्तगत

जळगाव शहरात 16 एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मुस्तकीन शेख सईद (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे मोटारसायकलने जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्याने जात असताना दोन अज्ञातांनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. मुस्तकीन शेख सईद यांच्या कडे पैसे नसल्याने आरोपींनी त्यांच्याकील सुमारे ६ हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मुकेश अटवाळ याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने साथीदार चंद्रकांत रमेश दिवेकर याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेला व्हिवो कंपनीचा मोबाईल जप्त केला. तपासात अक्षय अटवाळ याच्याविरुद्ध यापूर्वी जबरी चोरी व चोरीचे चार गुन्हे दाखल असल्याचेही निष्पन्न झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news