Parbhani Crime News | चारठाणा येथे कुजलेल्या अवस्थेत बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Missing Woman Death Charthana
चारठाणा : चारठाणा येथील बस स्थानक परिसरातील एका माळरानावर आज (दि.१) सकाळी कुजलेल्या अवस्थेत विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. मीना चरचरे (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. ती बुधवारपासून बेपत्ता होती. तिचा फोनही लागत नव्हता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मीना चरचरे या महिलेचे माहेर मंठा असून ही महिला चारठाणा परिसरात एका धाब्यावर काम करीत होती. या महिलेला एक मुलगा असून तो त्याच्या आईला बुधवारपासून फोन लावत होता. परंतु, फोन लागत नव्हता. दरम्यान, त्या परिसरातील वस्तीत राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधीचा वास येऊ लागला. त्याचा शोध घेतला असता माळरानावर कुजलेल्या अवस्थेत दुर्गंधी सुटलेला मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचें सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड, बीट जामदार उद्धव माने, बीट जमादार उद्धव सातपुते, जिलानी शेख, अशितोष माने, रविराज वानरे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी महिलेच्या बाहेरगावी असलेल्या नातेवाईकांशी संपर्क साधला आहे.
या घटनेची माहिती मिळताच परभणीहून फॉरेन्सिक वाहन पाचारण करण्यात आले. परंतु, या पथकाला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने काहीच करता आले नाही. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालानंतर या महिलेच्या मृत्यू कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

