

Damaged condition National flag flying on gantry crane on Samriddhi Highway
पूर्णा, पुढारी वृत्तसेवा :
शहरालगत पूर्णा-धनगर टाकळी रस्त्यावर सुरू असलेल्या समृध्दी महामार्ग कामस्थळी गॅन्ट्री क्रेनवर फडकविण्यात आलेला तिरंगा राष्ट्रध्वज जीर्ण व फाटलेल्या अवस्थेत आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली. याप्रकरणी संबंधित तिरंगा इन्फा कंपनीच्या व्यवस्थापकाविरुध्द पूर्णा पोलिस ठाण्यात रविवारी (दि.१५) गुन्हा नोंदविण्यात आला.
पूर्णा शहरालगत ग्रामीण शेतशिव-ारात समृध्दी महामार्गाचे मजबुतीकरण व बांधकाम सुरू आहे. या कामासाठी गुजरातस्थित मोंटोकार्लो कंपनीसह तिरंगा इन्फा कंपनीला ठेका देण्यात आला आहे. पूर्णा-नांदेड रोडवरील टाकळी फाट्याजवळ कंपनीचे तात्पुरते कार्यालय व यंत्रसामग्री उभारण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त संबंधित कंपनीकडून गॅन्ट्री क्रेनवर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला होता.
मात्र त्यानंतर ध्वजाची आवश्यक ती देखभाल, निगा किंवा बदल करण्यात आला नसल्याने तो कालांतराने फाटलेल्या व जीर्ण अवस्थेतच क्रेनवर लटकत राहिला. यातच १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन विचारणा केली. ध्वज कधी लावला व त्याची योग्य देखभाल का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी प्रशासनाला माहिती दिली.
भारतीय ध्वज संहितेनुसार फाटलेला, मळलेला किंवा खराब झालेला राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक त्वरित उतरवणे बंधनकारक आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होईल अशाप्रकारे तो ठेवणे कायद्याने दंडनीय अपराध आहे. या पाश्र्वभूमीवर संबंधित व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उपस्थित पंचांच्या साक्षीने फाटलेला ध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवून पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांच्या फिर्यादीवरून तिरंगा इन्फ्रा कंपनीचे व्यवस्थापक सुजित धीरूभाई पटेल (वय ३५, रा. अहमदाबाद, गुजरात) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पूर्णा ठाण्यातील पोलिस करत आहेत.
तालुक्यात संतापाची लाट
सदर घटनेमुळे शहरासह ग्रामीण भागातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रध्वज हा देशाच्या अस्मितेचे प्रतीक असून त्याचा सन्मान राखणे प्रत्येक नागरिक व संस्थेची जबाबदारी आहे. बांधकाम कंपन्यांनी राष्ट्रीय प्रतीकांबाबत अधिक संवेद-नशीलता दाखवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी तथ्ये समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.