

Gangakhed to be 'DJ free' for Shiv Janmotsav
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : येथे यंदाचा शिवजन्मोत्सव विविध सामाजिक उपक्रमांसह पारंपरिक पध्दतीने साजरा करण्यात येणार असून, यावर्षी प्रथमच डीजे व ढोल-ताशांच्या गजराऐवजी भजन, टाळ मृदंगाच्या निनादात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराणा प्रताप चौक शिवजन्मोत्सव कमिटी, शिवजन्मोत्सव कमिटी गोदाकाठ आणि राजा शिवछत्रपती सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मिरवणूक काढून शिवजन्मोत्सव साजरा केला जात होता. गतवर्षी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, त्याचे सुशोभीकरण पुढील काळात करण्यात येणार आहे.
यंदाच्या उत्सवात कुठलाही डीजे अथवा ढोलपथक न ठेवता, पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या पध्दतीने पालखी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दि.१७ व १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि.१८ फेब्रुवारीला रात्री १० वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून, रात्री १२ वाजता महाआरती व आतिषबाजी होणार आहे.
दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता संत जनाबाई मंदिरातून वारकरी व महिलांच्या सहभागासह भजन करत पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. नंतर दुपारी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. सर्व कार्यक्रम शिवस्मारकात होणार असून महिला, युवक व सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
वेगवेगळ्या दोन शिवजयंती साजरी होत असताना गतवर्षी शिवस्मारकाच्या प्रयत्नासाठी एकच शिवजयंती शहरात साजरी केली. याचीच प्रचिती म्हणून यंदा धांगडधिंगा नको, धार्मिक पध्दतीने शिवजयंती साजरी करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद मानला जात आहे.