

Commuting from Parbhani to Mumbai for the culture of reading!
परभणी : पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक वाचन संस्कृतीचा प्रसार आणि सामाजिक जनजागृतीचा वसा घेऊन निघालेली परभणी ते मुंबई सायकल यात्रा यशस्वीरीत्या पार पडली. एचएआरसीचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी सुमारे ६०० किलोमीटरचा टप्पा सायकलने पार करत मंत्रालयात या अनोख्या मोहिमेचा समारोप केला.
दि. २९ नोव्हेंबर रोजी परभणीतून सुरू झालेली ही यात्रा जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, ठाणे या पाच जिल्ह्यांतून प्रवास करत २ डिसेंबरला मुंबईत पोहोचली. या चार दिवसांच्या प्रवासात डॉ. चांडक आणि त्यांचे सहकारी प्रकाश डुबे यांनी वाचन संस्कृतीचे बीज रोवण्यासाठी महत्त्व -पूर्ण कार्य केले.
केवळ प्रवास न करता या दोघांनी मार्गातील जिल्हा परिषद शाळा आणि महाविद्यालयांना भेटी दिल्या. लोकसहभागातून निवडक १० जिल्हा परिषद शाळांना प्रत्येकी ७५ पुस्तकांची आनंदी वाचनपेटी भेट देण्यात आली. वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच मोबाईल व्यसनमुक्ती, सायकलचा वापर, एड्स जनजागृती, बेटी बचाओ-बेटी पढाओ आणि बालविवाह प्रतिबंध अशा विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांशी संवाद साधला.
यात्रेचा समारोप मुंबई मंत्रालयात झाला. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी डॉ. चांडक यांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित केले. यावेळी भाषा संचालक अरुण गिते, सांस्कृतिक विभागाच्या उपसचिव नंदा राऊत आणि नामदेव कोळी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. शैलेश मंत्री (जिंतूर), दत्तात्रय राऊतवाड (मंठा), राजीव हजारे (वाटूर), सोनी परिवार (बदनापूर), रमा मुंदडा, डॉ. सुनील धुळे (संभाजीनगर), विनीत देशपांडे (लासूर), हर्षल मुंदडा, अनिल भुजबळ (कोपरगाव), श्रीनिवास जाजू (वावी), किरण भावसार (सिन्नर), शरद ठाकर आणि माधव गव्हाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले
समाज परिवर्तनासाठी दोन चाकांचा प्रवास
डॉ. पवन चांडक आणि प्रकाश डुबे यांनी केवळ शारीरिक कसरतीसाठी सायकल चालवली नाही, तर त्यामागे समाजप्रबोधनाचा मोठा उद्देश होता. सध्याच्या डिजिटल युगात पुस्तकांपासून दूर जाणाऱ्या पिढीला पुन्हा वाचनाकडे वळवणे आणि आरोग्यासाठी सायकलिंगचे महत्त्व पटवून देणे, हा या ६०० किमी प्रवासाचा मुख्य गाभा होता. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाची विशेष दखल घेतली आहे.