

Children's Day Collector Bullock Cart Ride:
परभणी, पुढारी वृत्तसेवा :
बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभागाच्यावतीने बालगृहातील मुलांसाठी तालुक्यातील धर्मापुरी येथील श्रीराम बाग येथे शुक्रवारी एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत मुलांनी मनसोक्त आनंद लुटत संस्मरणीय क्षण अनुभवले. तसेच याप्रसंगी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी स्वतः बैलगाडी हाकत मुलांना फेरी मारून आणली. त्यांनी मुलांसोबत गाणी गायली, गप्पा मारल्या आणि प्रेमाने बालदिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्यात मिसळून उत्सवाचा आनंद वाढवला. जिल्हाधिकाऱ्यांची मुलांसोबतची सहज, आपुलकीची वागणूक सर्वांच्या लक्षात राहिली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मुलांचे स्वागत करत बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांनी नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत विविध खेळ, उपक्रम आणि सहलीतील अनुभवात रममाण झाले. या अनुभवावर निबंध लिहिण्यासही मुलांना प्रोत्साहन देण्यात आले. सहलीच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे, ओबीसी महामंडळाचे संचालक रामेश्वर मुंढे, बालकल्याण समिती अध्यक्ष रवींद्र कातनेश्वरकर, समिती सदस्य, जिल्हा परिविक्षा अधिकारी, चाइल्ड हेल्पलाइन व बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी, बालगृह अधीक्षक व कर्मचारी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील या उपक्रमाने बालदिनाचा आनंद, निरागसता आणि मोकळेपणाचा खरा अर्थ उजाळला.