

चारठाणा: दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या परिसरातील नागरिकांच्या चिंतेत आता चोरट्यांनी भर घातली. चारठाणा शहरातील मातंग गल्ली, आतार मोहल्ला व कुरेशी मोहल्ला परिसरात एकाच रात्री तब्बल पाच घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या घटनांमध्ये सुमारे 2 लाख 75 हजार रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा मुद्देमाल लंपास केला. गुरुवारी (दि.1) मध्यरात्री या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कसबा विभागातील मुसक्कीन बु.ढ. कुरेशी यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील अंदाजे दीड लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा माधव गिराम यांच्या घराकडे वळविला. घराचे कुलूप तोडून कपाट व घरातील साहित्याची झडती घेत अंदाजे 10 ते 15 हजार रुपये रोख लंपास केले. नंतर चोरट्यांनी मातंग गल्लीतील ग्रा.पं.सदस्य गणेश पारवे यांच्या घराला लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून कपाटाची झडती घेत कपाटातील 50 हजार रुपये रोख चोरून नेले.
शेख बाबू शेख गणी हे कुटुंबासह ऊसतोडीसाठी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून त्यांच्या मुलीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. घर बंद असल्याने चोरीची घटना सकाळी उघडकीस आली.
त्यानंतर जितेश नितीराम जाधव यांच्या घराचेही कुलूप तोडण्यात आले. चोरट्यांनी घरातील कपाट व साहित्याची झडती घेत सुमारे 65 हजार रुपये रोख, दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याची सोन्याची बोरमाळ, एक तोळ्याची सोन्याची गहू पोत आणि सुमारे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे पत्री सेवन पीस असा ऐवज लंपास केला.
सर्व चोरीच्या घटना दुसर्या दिवशी सकाळी उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सपोनि बालाजी पुंड, जमादार उद्धव सातपुते यांनी घटनास्थळी पाहणी केली. चोरीच्या घटनास्थळी श्वान पथक तसेच ठसेतज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
कोरड्या दुष्काळामुळे नागरिक आधीच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.