

पूर्णा : कार- पिकअपची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आलेगाव येथील तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना परभणी - वसमत रोडवर राहटी-नांदगाव जवळ रविवारी (दि.१) पहाटे घडली. नितीन मारोतराव सवराते (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पूर्णा तालूक्यातील आलेगाव येथील नितीन सवराते यांचे छत्रपती संभाजीनगर येथे मेडीकल दुकान आहे. तेथेच ते वास्तव्यास असून शनिवारी (दि.३१) रात्री गावाकडे निघाले होते. रविवारी (दि.१) पहाटे १.३० च्या ते कारने परभणी - वसमत रोडवर राहटी नांदगाव जवळ आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने त्यांच्या कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात नितीन सवराते यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भिषण होता की, अपघातात कारचा चक्काचूर झाला होता. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच ताडकळस पोलिस घटनास्थळी दाखल झाले.