

Russia Train Accident |
रशियामध्ये युक्रेन सीमेजवळ पश्चिम ब्रायन्स्क भागात शनिवारी रात्री पूल कोसळल्याने रेल्वे रुळावरून घसरली. यातसात जणांचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले. ही रेल्वे मॉस्कोहून क्लिमोव्हला जात असताना वायगोनिचस्की जिल्ह्यात रुळावरून घसरली.
प्रादेशिक राज्यपाल अलेक्झांडर बोगोमाझ यांनी टेलिग्रामवर या अपघाताची माहिती दिली. ही दुर्घटना वाहतूकीत बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, परंतु अधिक माहिती दिली नाही. आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल आहेत. रशियातील राष्ट्रीय महामार्गाजवळ ही घटना घडली असून अनेक बचाव पथके घटनास्थळी काम करत आहेत. घटनास्थळावरून सरकारी संस्थांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रवाशांच्या गाड्या तुटलेल्या आणि कोसळलेल्या पुलावरून काँक्रीटच्या तुकड्यांमध्ये विखुरलेल्या दिसत आहेत.
रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा चालकही मृतांमध्ये आहे. हा पूल जाणीवपूर्वक उडवून देण्यात आला असावा, असा दावा केला जात आहे. मात्र, हे दावे स्वतंत्रपणे पडताळले गेलेले नाहीत. यावर यूक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
तीन वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून, ब्रायन्स्कसह सीमावर्ती भागात वारंवार ड्रोन हल्ले, विध्वंसक कारवाया आणि गोळीबारचे प्रकार घडत आहेत.