

Cancer treatment now in Parbhani
परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नुकतीच जबड्याच्या कॅन्सरवरील एक अति जटील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या शस्त्रक्रियेने जिल्ह्यातील रुग्णांना आता पुणे-मुंबईत जाण्याची गरज भासणार नाही. ही शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्या मार्गदर्शनात कॅन्सर तज्ञ डॉ. मनोज मोरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
एक ६० वर्षीय मजुरी करणारा पुरुष दीर्घकाळ तंबाखूचे व्यसन करत होता. त्याला जबड्याच्या कॅन्सरचे निदान तपासणीनंतर निष्पन्न झाले. यानंतर त्याच्यावर डाव्या बाजूचा पूर्ण जबडा काढून छातीच्या त्वचा व स्नायू वापरून नव्याने जबड्याची निर्मिती करण्यात आली.
या प्रकारच्या शस्त्रक्रिया सामान्यतः मुंबई, पुणे अशा ठिकाणीच केल्या जातात, मात्र परभणीत ती यशस्वी झाली. यापुर्वी ७० वर्षीय रुग्णावर गुदद्व-राराच्या कॅन्सरवर शस्त्रक्रिया झाली. यात अत्याधुनिक स्टेपरल सिस्टीमचा वापर करून गुदद्वाराची जागा काढण्याची गरज टाळली.
ही उपकरणे ८० हजारांची असून ती येथे निशुल्क उपलब्ध झाली. तेलंगणातील ४८ वर्षीय महिलेला १० किलो वजनाची अंडाशयातील गाठ होती. ती गर्भाशय व पोटातील आवरणासह एकसंध शस्त्रक्रियेने काढली. १६ वर्षीय मुलीच्या गुद्वार कॅन्सरवर सिग्नेट रिंग अॅडेनोकार्सिनोमाची शस्त्रक्रिया झाली. २० वर्षीय युवतीवर रॅवडोमायोसारकोमा स्तन कॅन्सरवरील शस्त्रक्रियाही झाली. ३२ वर्षीय युवकाची गुदद्व-ाराची जागा वाचवित कंटूर कर्बड कटर व स्टॅपलर वापरून शस्त्रक्रिया केली.
या सर्व रुग्णांवर पूर्ण मोफत उपचार केले असून शस्त्रक्रियेअंती आवश्यक केमो-थेरपी सेवा परभणीत उपलब्ध झाली. पण रेडिएशनसाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याची गरज भासणार आहे. कॅन्सर हा जीवघेणा असला तरी वेळेत निदान व योग्य उपचारांनी तो बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा असे डॉ. मनोज मोरे म्हणाले.