

Maratha reservation Manoj Jarange Patil Criticism government
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे ही आपली प्रमुख मागणी आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत. मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्ष संधी दिली, आता सरकारला संधी द्यायची नाही असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तालुक्यातील धारासूर येथे गुरुवारी सायंकाळी उशिरा चावडी बैठकी निमित्त मनोज जरांगे पाटील हे आले असताना चावडी बैठकीचे रुपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते.
श्रीमंत मराठ्यांनी राजकारण जरूर करावे, पण त्याअगोदर आपल्या लेकरा बाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. आज आरक्षणाअभावी मराठा युवक सुशिक्षित बेरोजगार म्हणून फिरत आहेत. आरक्षणासाठीची एकजूट फुटू द्यायची नाही, अशी साद घालत एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही असा शब्द उपस्थित जनसमुदायाला जरांगे पाटील यांनी दिला.
सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटायचे नाही. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांचे प्रमाणपत्र रोखून धरल्या जात असल्याची माहिती आपल्याला समजली असून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यात खोडा घालत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. आपण कुणावर खोटे आरोप करत नाही, परंतु मराठा समाजाला वेठीस धराल तर गाठ माझ्याशी आहे.
मी कचाट्यात आल्यावर सोडत नाही असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी मराठा समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष श्रीकांत भोसले, कृष्णा भोसले, प्रताप कदम, अतुल जाधव, राजाभाऊ कदम, राजाभाऊ खोडवे, प्रकाश खंटिंग, संतोष बोबडे, बाळु बेद्रे, दगडू जाधव, लक्ष्मण कदम, कुलदीप जाधव, गणेश कदम, विष्णू कदम, अशोक कदम, राजाभाऊ डिळेकर, निखील कदम यांच्यासह धारासूर परिसरातील हजारो मराठा बांधव, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्याना कुणबी प्रमाणापत्र द्या, परंतु ते वेळेवर देऊ नका. प्रमाणपत्र दिलेच तर त्या प्रमाणपत्राची वैधता होऊ देऊ नका. सामाजिक न्याय खाते माझ्याकडेच असून कुणबी प्रमाणपत्र देऊ नका असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. ज्या मराठा समाजाने संजय शिरसाठ यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तेच शिरसाठ मराठ्यांच्या ताटात विष कालवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.