

Cabinet approves Pokhara Project Phase-2
परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासन व जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २' ला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. दि.२९ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी मिळाली. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १७३ गावांचा कृषी विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदरील पोकरा प्रकल्प आगामी ६ वर्षांच्या कालावधीत पूर्णत्वास नेण्यात येणार असून राज्यातील २१ जिल्ह्यांतील ७२ हजार २०१ गावांचा त्यात समावेश आहे. यामध्ये परभणी जिल्ह्याचे विशेष योगदान असून विविध तालुक्यांतील १७३ गावे या प्रकल्पात सहभागी करण्यात येत आहेत.
हा प्रकल्प महाराष्ट्रातील हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतीत शाश्वतता आणण्यासाठी आखण्यात आलेला आहे. मृदा आरोग्य, जलसंधारण, पीक विविधीकरण, हवामान आधारित सल्ला, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर अशा विविध घटकांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, पाण्याचे साधन, मृद परीक्षण किट्स, इतर आधुनिक साधने ही अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या प्रकल्पातून शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य मजबूत होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. परभणी जिल्हा हा अनेक वर्षांपासून कोरडवाहू शेती, कमी उत्पादन व पावसाच्या अविश्वासार्हतेमुळे अडचणीत आलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील शेतीला नवसंजीवनी मिळणार असून शाश्वत शेती, उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने हा प्रकल्प प्रभावी ठरणार आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक व इतर तांत्रिक कर्मचारी हे विशेष जबाबदारी पार पाडणार आहेत. गावपातळीवर शेतकरी गट तयार करून प्रशिक्षण सत्रे, प्रात्यक्षिके, मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचा उद्देश 'शेतकऱ्याच्या हातात साधनं आणि डोक्यात ज्ञान' या तत्वावर आधारित आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत जिल्ह्यात कृषी विकासाच्या बाबतीत नवा अध्याय सुरू होणार असल्याची खात्री शासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.