

Body found in Jintur Market Committee's cistern
परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हौदात शुक्रवारी (दि.३१) सकाळी एकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना बाजार समितीच्या हौदात एक व्यक्ती पाण्यात बुडाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस हवालदार दुधाटे व देवकते यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.
सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने हौदातील मृतदेह बाहेर काढण्यात आला. प्राथमिक पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख अफरोज यांनी तपासणीअंती त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
सपोनि विजय जाधव यांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी परिसरातील नागरिकांना व सोशल मीडियावर फोटो पाठवून माहिती मागवली. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख राजू किशन धामणे (वय ४५, रा. रमाई नगर, बोरी) अशी पटली. मृतक विवाहित असून पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. तो चर्मकार व्यवसायानिमित्त वारंवार बाहेर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे.