

परभणी : मनपा निवडणुकीमध्ये भाजप व शिंदे सेनेची युती शेवटच्या क्षणी फिस्कटली होती. मंगळवारी शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये जिल्हा परिषदेच्या युती संदर्भात दिवसभर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते.
शिवसेना-भाजप युतीसंदर्भात वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर शहरातील एका हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. काही तास बैठक पार पडल्यानंतरही ठोस असा निर्णय झाला नसल्याचे वृत्त आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, राजू कापसे पाटील, डॉ.मदन लांडगे, माजी खा.सुरेश जाधव यांनी उपस्थिती लावली.
भाजपकडून राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्यासाठी आग्रही असून त्याबाबत राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांना तशा सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत.
मंगळवारी दोन्ही पक्षांचे राज्यमंत्री व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काही तासांची बैठक पार पडल्यानंतर बैठकीमध्ये काही तोडगा न निघाल्यामुळे जिल्हा परिषदेतही शिवसेना-भाजप युती फिस्कटणार काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मनपा निवडणुकीत शिवसेना व भाजप युती शेवटच्या क्षणी फिसकटली होती. निवडणूक निकालामध्ये त्याचा फटका दोन्हीही पक्षांच्या उमेदवारांना बसल्याचे दिसून आले. शिवसेना शिंदे गटाला मनपा निवडणुकीत खातेही उघडता आले नसले तरी अनेक प्रभागांमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांनी घेतलेल्या चांगल्या मतांमुळे भाजपा उमेदवारांचे पराभव झाले.
मनपामध्ये दोन्ही पक्षांना झटका बसल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून युती करण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. असे असतानाही स्थानिक पातळीवर शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन होताना दिसून येत नाही. शिवसेना शिंदे गटाने ग्रामीण भागात आमचा प्रभाव असल्यामुळे आम्हाला जास्त जागा देण्यात याव्यात अशी मागणी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. युतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ अशी भूमिका भाजपाने बैठकी दरम्यान घेतल्यामुळे मॅरेथॉन बैठक चालल्यानंतरही बैठकीतून शिवसेना-भाजप युतीबाबत ठोस तोडगा निघू शकला नाही.
शिवसेना-भाजप युतीचे काही ठरत नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.राजेश विटेकर यांच्यावर राष्ट्रवादीची जिल्हा परिषद निवडणुकीची मदार असणार आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा परिषदेची निवडणूक ताकतीने लढविण्याचे जाहीर केले असून ठाकरे शिवसेना जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या मानसिकतेत आहे. काँग्रेसने मात्र वंचित, रासप सारख्या समविचारी पक्षांशी युती करण्याबाबतचे सूतोवाच केले आहे. एकंदरीत जिल्हा परिषद निवडणुकीत प्रमुख सर्वच राजकीय पक्षांची आघाडी फिस्कटली तर स्वतंत्रपणे लढण्याच्या मानसिकतेत आहेत.
इच्छुकांची गर्दी वाढली
जिल्हा परिषदेच्या 54 गट व 108 गणांसाठी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या एकापेक्षा अधिक असल्यामुळे पक्षनेतृत्वापुढेही उमेदवार नेिवडीचा पेच निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्ष उमेदवारी मागणाऱ्या कार्यकर्त्यांला निवडणुकीत किती पैसे खर्च करू शकता असा सरळसरळ सवाल करत आहेत, यामुळे पक्षाचे प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मात्र गोची होताना दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी आयाराम गयाराम उमेदवारीची संधी हुकल्यानंतर दुसऱ्या पक्षात उडी मारताना दिसून येणार आहेत.