

वसमत ः बोल्डा ते वाई मार्गावर मरसुळ शिवारात कुरुंदा पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी टिप्पर चालका विरुध्द मंगळवारी कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभाग तर पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस विभागाची पथके सतर्क केली आहेत. या पथकांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर तातडीने कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपुर्वीच औंढा नागनाथ पोलिसांच्या पथकाने रुपुर शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून तीन जेसीबी, तीन ट्रॅक्टर असा 89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 16 जणांवर गु्ुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, त्यानंतर बोल्डा ते वाई मार्गावर नांदेड कडून एका टिप्परमध्ये वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून जमादार संदीप पवार, सतीश नरवाडे, सुमीत टाले, विनोद कुटे यांच्या पथकाने तातडीने बोल्डा ते वाई मार्गावर मरसुळ शिवारात वाहनांची तपासणी सुरू केली.
यावेळी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास नांदेडकडून वाळू घेऊन एक टिप्पर येत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी टिप्पर थांबवून चालक सचिन मोरे (रा. शाहूनगर, हडको, नांदेड) याची चौकशी केली. मात्र त्याच्याकडे वाळू वाहतूकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी वाळू व टिप्पर असा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी जमादार सतीश नरवाडे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात टिप्पर चालक सचिन मोरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संदीप टाक पुढील तपास करीत आहेत.