Holi 2024 : धुळवडीला चढणार लाली; पळस झाडे लाल, केशरी रंगांनी बहरली | पुढारी

 Holi 2024 : धुळवडीला चढणार लाली; पळस झाडे लाल, केशरी रंगांनी बहरली

आनंद ढोणे

पूर्णा: होळीच्या सणानंतर दुसऱ्याच दिवशी असणा-या धुळवड सणाला रंगपंचमी खेळण्यासाठी पळसांच्या फुलांचे अनन्यसाधारण असे अनादीकाळापासून महत्व आहे. पळसांची फुले होळीच्या दिवशी रात्रभर पाण्यात भिजवून खलबत्यात कुटून त्याच्या लगद्याचा उत्तम असा नैसर्गिक रंग तयार होतो. फुलांच्या रंगाची उधळण केल्यास कोणतीही शारीरिक हानी होत नाही. परंतु अलिकडच्या काही वर्षांपासून पळसाच्या रंगाऐवजी रासायनिक रेडिमेड रंगाचा वापर होवू लागला आहे. Holi 2024

केमिकलयुक्त रंगाच्या वापराने खुप मोठे आरोग्याचे नुकसान होत असतानाही युवापिढी पळस फुलांचा वापर करीत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. निसर्ग आपले चक्र अविरत चालूच ठेवते. होळी आणि धुलिवंदन या दुहेरी सणाची चाहूल लागताच रानावनात पळस झाडे फुलू लागतात. शिशिरातील हंगामात वृक्षांची पानगळ सुरु होवून त्याला नवीन डीर येवू लागते. मात्र, पळस झाडांची पानगळ सुरु होण्याआधी फांद्यांना लाल, केशरी रंगाची फुले लगडू लागतात. सध्या पूर्णा तालुक्यातील शेतशिवारात मागील पंधरा दिवसांपासून सर्वत्र रानोवनी पळस झाडे लाल केशरी रंगाच्या फुलांनी बहरून गेल्याचे दिसू लागले आहे. Holi 2024

रविवारी (दि.२४) होळीचा सण झाल्यानंतर सोमवारी धुलिवंदन आहे. सर्व ठिकाणी गायीच्या शेण गव-यांची होळी पेटवून विधीवत पूजा केली जाईल. पेटलेल्या होळीच्या अहरावर खोबरे भाजून खाल्ले जाते. तर दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच होळीची राख अंगाला लावून बच्चे कंपनी शिव्यांची लाखोली वाहत होबोबो..असे बोंबलत गल्लोगल्ली फिरतील.

यावेळी रंगपंचमी खेळताना रासायनिक पावडर, लिक्वीड रंगाची धुळवड साजरी केली जाते. यंदाच्या होळीला लोकसभा निवडणुकीची झालर आहे. त्यामुळे गाव पुढारी हौसेनवसे मंडळी धुळवड उडवू शकतात. वाड्या तांड्यावरील धुलिवंदन पाहण्यासारखे असते. धुळवड, रंगपंचमी खेळण्यासाठी बच्चेकंपनी रानावनात जाऊन पळस फुले सावडून रंग तयार करुन रंगपंचमी खेळतात.

हेही वाचा 

Back to top button