परभणी: आहेरवाडी शिवारात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटेना, पोलिसांकडून पत्रक जारी | पुढारी

परभणी: आहेरवाडी शिवारात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटेना, पोलिसांकडून पत्रक जारी

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : झिरोफाटा ते पूर्णा रस्त्यावरील आहेरवाडी शेतशिवार आश्रम शाळेजवळील शेतात एका अनोळखी (वय अंदाजे ५०) व्यक्तीचा कुजलेल्या आणि निवस्त्र अवस्थेत मृतदेह शनिवारी (दि.१६) सायंकाळी पाचच्या सुमारास आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पूर्णा पोलीस पेचात पडले आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

याबाबत पोलिसांनी एक प्रसिध्दी पत्रक जारी केले आहे. त्यात खालीलप्रमाणे वर्णन नमूद केले आहे. या मृत व्यक्तीचा रंग गोरा, डोक्यावर समोरच्या बाजूला थोडे टक्कल पडलेले असून केस काळे पांढरे आहेत. सडपातळ बांधा, अंगामध्ये बदामी रंगाचे शर्ट त्यावर काळ्या व लाल रंगाची ‌पानाच्या आकाराची फुलाचे डिझाईन व‌ काळ्या ठिपके असलेला पोशाख, उंची अंदाजे ५ फूट ६ इंच इतकी आहे. तरी या वर्णनाच्या व्यकीची कोणाला माहिती असल्यास पूर्णा पोलीस स्टेशन‌ येथील ८६००३१११३८ व ८३२९६४५०२० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा,‌ असे आवाहन तपास पोलीस अधिकारी सी. व्ही. केंद्रे यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आहेरवाडी शिवारात एक बंद पडलेली आश्रम शाळा आहे. येथे आहेरवाडी येथील मोरे कुटुंबियांची शेती आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान मोरे यांच्या शेतात काम करणारा सालगडी संतोष मोरे यांना दुर्गंधीचा वास  येवू लागला. तो वासाचा दिशेने शोध काढत पुढे गेला असता ज्वारीच्या पिकात एका माणसाचा विवस्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला. आहेरवाडीचे पोलीस पाटील बालाजी मोरे यांनी याची माहिती पूर्णा पोलीस ठाण्यात दिली. तोपर्यंत घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पूर्णा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, फौजदार केंद्रे, श्याम कुरील हे घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेहाला दुर्गंधी येत असल्याने मृतदेहाचे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण केले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? कुठली आहे? त्याचा मृत्यू कशामुळे झाला? त्यास कोणी मारुन टाकले का? याचा तपास पूर्णा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी येथील परिसरात एक अनोळखी वेडसर व्यक्ती फिरत असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button