परभणी : सेलूत शासकीय कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद; पेरानोंद ठरते अडसर

परभणी : सेलूत शासकीय कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद; पेरानोंद ठरते अडसर

सेलू , श्रीपाद कुलकर्णी : तालुक्यासह बाहेरून येणारे कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस विक्री करताना खासगी खरेदीला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण सीसीआय म्हणजे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर पेरानोंदीची अट यासाठी अडसर ठरत आहे. त्यामुळे शासकीय खरेदीला अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

सेलू शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती, महेश खासगी बाजार आणि केंद्रीय कापूस निगम अशा तीन ठिकाणी कापूस खरेदी सुरू आहे.Parbhani cotton purchase यात सर्वाधिक प्रतिसाद कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदीला मिळालेला आहे. नोव्हेंबर २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान सरासरी १ लाख ८० हजार क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. त्यापाठोपाठ महेश खासगी बाजार अंतर्गत सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर डिसेंबर २०२३, ३६ हजार ८७७.१० क्विंटल तर जानेवारी २०२४, ६४५३६.८३ आणि फेब्रुवारी २०२४, ३५ हजार क्विंटल, असा एकूण ०१ लाख ३६४१३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तर सीसीआय म्हणजे शासकीय कापूस खरेदी केंद्रावर केवळ १७ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सरासरी ६८०० ते ७३०० रुपये, महेश खासगी बाजार अंतर्गत सुपर कापसासाठी ७००० ते ७१५० रुपये तर रेनटच एफ ए क्यू कापसासाठी ५७०० ते ६६०० रुपये दर देण्यात आलेला आहे. तर शासकीय खरेदी म्हणजे सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर सरासरी ७ हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कापूस दर देण्यात आलेला आहे.

शासकीय खरेदी केंद्रावर आरटीजीएसद्वारे आठ दिवसांतर्गत तर कृषी उत्पन्न बाजार समिती व महेश खासगी बाजारांतर्गत आरटीजीएस द्वारे आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात येत आहे.

कापूस पेरानोंद अडसर?

शेतकऱ्यांनी आपला उत्पादित कापूस शेतातच पिकवलेला आहे. त्यामुळे कृषीउत्पन्न बाजार समिती व महेश खासगी बाजार अंतर्गत खरेदी करताना कापूस पेरानोंद तपासली जात नाही. हाच नियम शासकीय खरेदी करताना लागू केला तर सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांना कापूस विक्री करतानाची प्रक्रिया सुलभ होऊ शकते. तसेच नाव नोंदणी, आधार कार्ड, बँक पासबूक यासाठी देखील खासगी खरेदी केंद्रावरील प्रक्रिया राबवली तर शेतकऱ्यांना आपला उत्पादित कापूस इच्छेनुसार विक्री करता येऊ शकेल. खासगी खरेदी व शासकीय खरेदी यातील अटी वेगवेगळ्या असल्याने शासकीय खरेदीला अत्यल्प प्रतिसाद मिळत असून पेरानोंद हा नियमच यासाठी अडसर ठरत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सव्वातीन लाख क्विंटल खरेदी

सेलू तालुक्यासह बाहेरून येणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून सेलू शहरातील विविध खरेदी केंद्रात २० फेब्रुवारी २०१४ पर्यंत एकूण सव्वातीन लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यात कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदी केंद्रावर १ लाख ८० हजार क्विंटल, महेश खासगी बाजार अंतर्गत खरेदी केंद्रावर १ लाख ३६ हजार क्विंटल तर सीसीआय अंतर्गत खरेदी केंद्रावर १७ हजार क्विंटल, असा एकूण ३ लाख 33 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ही कापूस खरेदी शहरातील ०७ ते ०८ जिनिंगद्वारे करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news