जिंतूर: पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिन्यात बंजारा समाजाच्या वतीने 'तीज' हा सांस्कृतिक महोत्सव साजरा केला जातो. दि ४ ते १३ सप्टेंबरदरम्यान जिंतूर शहरातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकनगर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर जालना रोड परिसरात बंजारा समाजाच्या वतीने तीज उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. Parbhani
जिंतूर शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरिता स्थायिक झालेला बंजारा समाज एकत्र येऊन आपले सांस्कृतिक वेगळेपण आजही जपत आहे. श्रावण महिना म्हणजे बंजारा समाजातील तरुणींसाठी आनंदाचे हे पर्व, सर्व हेवेदावे विसरून या तरुणी 'तिजोत्सव'ची स्थापना करून आनंद लुटतात. बंजारा समाजाने पूर्वीपासून तिजोत्सव ही पारंपरिक प्रथा जोपासली आहे. Parbhani
यामध्ये पहिल्या दिवशी तरुणी रानावनात जाऊन तेथील वारुळाची माती आणून टोपलीत टाकतात. त्यानंतर त्यामध्ये गहू टाकत जवाराची स्थापना करतात. सकाळी आणि संध्याकाळी पारंपरिक बंजारा लोकगीत गात या तरुणी घरोघरी जाऊन त्या टोपल्यात पाणी टाकतात. न चुकता सलग नऊ दिवस ही प्रक्रिया चालते. या दिवसात गहू अंकुरित होऊन स्त्रिया व मुलींनी हिरिरीने सहभाग घेत, संत सेवालाल महाराज पोहरगड, देवी सामकी माता, संत ईश्वरसिंग महाराज, देव-देवतांची नावाने फेर धरत नृत्य केले जाते.
यावेळी बंजारा समाज तीज उत्सावाचे आयोजक आमदार मेघना बोर्डीकर मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी सांगितले की, 'गोर बंजारा समाजामध्ये तीज उत्सव अनादिकालापासून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. समाजाच्या रुढी-परंपरा टिकून राहाव्यात. तसेच अशा उपक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज एकत्र येत असतो.
अॅड. विनोद राठोड म्हणाले की, जिंतूर शहरात प्रथमच तीज उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात दोनशेहून अधिक कुटुंबे सहभागी झाली आहेत. बंजारा समाजाच्या रुढी-परंपरा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा