Parbhani Crime News: ब्राह्मणगाव येथे राजकीय वादातून उपसरपंचाच्या मुलाचा खून

Parbhani Crime News: ब्राह्मणगाव येथे राजकीय वादातून उपसरपंचाच्या मुलाचा खून

सेलू : पुढारी वृत्तसेवा: सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे सरपंच पती व उपसरपंच पती यांच्या राजकीय वादातून उपसरपंचाचा मुलगा निखिल कांबळे (वय 30) याचा खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली (Parbhani Crime News)  आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणगाव येथील उपसरपंच शशिकलाबाई रमेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरपंच साधना केशव डोईफोडे व पती केशव डोईफोडे तसेच कौसाबाई डोईफोडे हे शनिवारी (दि. ५) उपसरपंचांच्या घरी आले होते. व त्यांनी उपसरपंच यांना उपसरपंच पदाचा राजीनामा दे असे सांगितले. दरम्यान सायंकाळी ६ वाजता उपसरपंच यांचा मुलगा निखिल व पती रमेश गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ थांबलेले असताना, सरपंच साधना केशव डोईफोडे, केशव डोईफोडे, पुनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई भगवान डोईफोडे हे तेथे आले. आणि त्यांनी उपसरपंचाच्या मुलाला व पतीला तुम्ही राजीनामा का देत नाहीत? असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Parbhani Crime News)

दरम्यान, याची माहिती गावातील किरण कांबळे या तरुणाने उपसरपंच शशिकलाबाई यांनी घरी जाऊन दिली. तुमचा मुलगा व पती यांना सरपंच व त्यांचे नातेवाईक मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यावेळी शशिकलाबाई व त्यांचा मुलगा स्वप्निल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. व भांडण सोडवली. त्यावेळी सरपंच पती केशव डोईफोडे यांनी जातिवाचक शिवीगाळ करत उपसरपंच होण्याची तुमची लायकी नाही. तुमच्याकडे बघून घेऊ, अशी धमकी देत तुम्हाला ठार मारू, असे म्हणत उपसरपंच, उपसरपंच पती, व त्यांच्या मुलाला मारहाण केली.

केशव डोईफोडे यांनी रॉडने मारहाण केली. तर, महादेव डोईफोडे याने दगडाने, साधना डोईफोडे, पूनम डोईफोडे यांनी उपसरपंचाच्या मुलगा निखिल याच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्यास गंभीर दुखापत केली. तसेच कौसाबाई यांनी हातातील चटणी (मिरची पूड) निखिलच्या डोळ्यात टाकली. तसेच स्वप्निल व उपसरपंच यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. उपसरपंच पती भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत उपसरपंचाचा मुलगा निखिल बेशुद्ध झाल्यामुळे त्यास तत्काळ सेलू पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी त्यास तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ परभणीला जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, परभणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता निखिल याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी साधना डोईफोडे, केशव डोईफोडे, पूनम डोईफोडे, महादेव डोईफोडे, कौसाबाई डोईफोडे (सर्व रा. ब्राह्मणगाव) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ करत आहेत. ब्राह्मणगाव येथे तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news