

परभणी, पुढारी वृत्तसेवा : रस्ता शोधण्याची वेळ आलेल्या कारेगाव रस्त्याच्या खड्डेमय अवस्थेवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक विशाल बुधवंत यांनी शुक्रवारी (दि.7) सायंकाळी चक्क सरण रचून त्यावर झोपण्याचे अनोखे आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी धाव घेत त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवर निविदा प्रक्रिया मंजुर झाल्याचे नमुद केले.
देशमुख गल्लीपासून सुपर मार्केट ते देशमुख हॉटेल कॉर्नर व पुढे उघडा महादेव पर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. महापालिकेने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या रस्त्याचे भुमिपूजनही झाले होते. निधीची तरतुदही करण्यात आली होती. या रस्त्याबरोबरच अन्य रस्त्यांसाठी तब्बल 80 कोटींचा निधी मंजूर केल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, दीड वर्ष उलटूनही या रस्त्याचे काम सुरूच झाले नाही. सत्तांतराच्या समीकरणात या रस्त्याला स्थगिती दिल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्याचे सांगत आहे. मात्र, रस्ता दुरूस्तीला प्रत्यक्षात सुरूवातच होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर डबके साचू लागल्याने वाहतूक करणे कसरतीचे ठरू लागले आहे.
या पार्श्वभूमीवर गतवर्षी देखील रस्त्यासाठी माजी नगरसेवक बुधवंत यांनी चक्क चिखलात झोपून आंदोलन केले होते. त्यावेळी महापालिकेने खड्डे बुजविले. मात्र, पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण झाल्याने बुधवंत यांनी आज सायंकाळी देशमुख हॉटेल कॉर्नर येथे रस्त्याच्या मध्यभागी सरण रचून अंतिम संस्काराची तयारी करून स्वत:ला झोपवून घेतले. या अचानक झालेल्या आंदोलनाने नवा मोंढा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व अभियंता देखील दाखल झाले. त्यांनी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला. तरी उपस्थितांनी या रस्त्याच्या दुरवस्थेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा