

श्रीक्षेत्र माहूर ः स्थानिक शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात 4 जाने.रोजी दु.1 वा. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे पाटील यांचे अध्यक्षतेत व संग्राम देशमुख आणि आकाश गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेसची आढावा बैठक पार पडली.बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गाडे पाटील यांनी भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांचा आणि लुटारुंचा पक्ष असल्याचा घणाघाती आरोप केला.
पत्रकार परिषदेत गाडे पाटील यांनी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीवर, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका अधिक सक्षम करण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठीच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हिंदू-मुस्लिम असा भेदाभेद करीत आहेत, असा दावा करून त्यांच्या त्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला.
पुढे बोलतांना प्रशासकराज असताना काही अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला, त्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही आपले हात ओले केले, असा कडाडून हल्ला केला. युवक काँग्रेस समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षात कर्तव्य, प्रामाणिकपणा व कामगिरीच्या जोरावर सर्वांना समान न्याय मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सन 2029 ला किनवट विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्ष लढवून विजयी होईल असा हुंकार गाडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत भरल्याने आगामी काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काँग्रेस पक्षाची आघाडी राहील किंवा नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष आनंद पाटील तूपडाळे, मोहन राठोड, किसन राठोड, जब्बारभाई, गफारभाई, सचिन बेहेर, सिद्धार्थ तामगाडगे, राजू सौंदलकर, संजय गायकवाड, शरीफभाई, जगदीश तुपदाळे, सलमान काजी, मन्नानभाई, सादिकभाई, जयकुमार अडकीने आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.