

बीड : जिल्हा परिषद शाळांमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दिली जाणारी आगाऊ वेतनवाढ 4 सप्टेंबर 2018 नंतर बंद करण्यात आल्याने जिल्हा आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ही वेतनवाढ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त शिक्षक समन्वय समितीने आ. विजयसिंह पंडित यांच्याकडे केली आहे.
ग्रामविकास व जलसंधारण विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या विविध शासन परिपत्रकांनुसार यापूर्वी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना त्यांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे एक जादा वेतनवाढ दिली जात होती. मात्र 4 सप्टेंबर 2018 नंतर जिल्हास्तरावर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ही आगाऊ वेतनवाढ देणे थांबवण्यात आले. त्यामुळे 2018 नंतर पुरस्कार मिळवलेल्या अनेक शिक्षकांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
प्रगतशील महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठी अशा स्वरूपाच्या सन्मानात्मक वेतनवाढीचे महत्त्व अधिक आहे, असे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर गेवराई विधानसभा सदस्य विजयसिंह पंडित यांच्याकडे निवेदन देऊन, 4 सप्टेंबर 2018 नंतर बंद करण्यात आलेली आगाऊ वेतनवाढ पूर्ववत सुरू करण्यासाठी शासन निर्णय काढावा व जिल्हा आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीवर शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.