

बिलोली ः तालुक्यातील कोंडलापूर - ऐनापूर शिवारातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मुरुमाच्या वाहतुकीमुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी सदरील धुळीमुळे शेतामधील पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. याबाबतची तक्रार कोंडलापूर येथील शेतकरी मारुती जाधव यांनी तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आत्महत्या करणार असल्याचा इशारा मारुती जाधव यांनी दिला आहे.
कोंडलापूर येथील तक्रारदार शेतकरी मारुती व्यंकटी जाधव यांचे मौजे ऐनापूर शिवारात शेती गट नं. 35 मध्ये क्षेत्र 0.30 या क्षेत्रात हळद लागवड केली आहे. त्यांच्या शेता लगतच कुंडलवाडी रोड असून ऐनापूर शिवारात अनेक जेसीबीद्वारे रात्रंदिवसत मुरुमाचे उत्खनन होत आहे. उत्खनन केलेल्या मुरुमाचे अनेक हायवा वाहनांद्वारे वाहतूक केल्या जात आहे. दहा ते बारा चाकी ओवरलोड वाहतूक करणाऱ्या हायवाच्या प्रतिनिधी शेकडो फेऱ्या होत आहेत.
परिणामी पूर्णतः धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून सदरील धूळ रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या हळद पिकावर पडून पीक पूर्णतः नष्ट होत आहे. सदर लागवडीसाठी कर्ज काढून पीक जोपासले जात आहे. पण मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे पूर्णतः नुकसान झाले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
सदरील मुरूम वाहतूक ताबडतोब बंद करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून पिकाची नुकसान भरपाई मदत मिळवून देण्याची मागणी पीडित शेतकऱ्याने तहसीलदार गजानन शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. सदरी पिकांचे नुकसानभरपाई न दिल्यास आत्महत्या करणार असल्याचा इशाराही मारुती जाधव या शेतकऱ्याने दिला आहे.
तेरी भी चूप, मेरी भी चूप ...
50 ते 100 ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी पाच दिवसांसाठी काढल्या जाते. मात्र त्या उलट अनेक जेसीबीद्वारे हजारो ब्रास मुरूम उत्खनन केल्या जात आहे. याकडे महसूलचे अधिकारी मात्र हेतू पुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’चा प्रत्यय बिलोली तहसील कार्यालयात पहावयास मिळत आहे.