

Congress Sahebrao Kamble Withdraws
प्रशांत भागवत
उमरखेड : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाविकास आघाडीला (मविआ) यवतमाळमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी मविआकडून साहेबराव कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांचा सामना महायुतीचे उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांच्याशी होणार होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला.
माघारीचे कारण स्पष्ट करताना कांबळे यांनी, "निवडणुकीसाठी आवश्यक संख्याबळ उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेतला," असे सांगितले. तसेच उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभारही मानले.
कांबळे यांच्या निर्णयामुळे मविआसमोर नवे राजकीय प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या माघारीनंतर मविआ कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, या घडामोडीमुळे महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत गुरुवार, ४ जून रोजी असताना कांबळे यांनी बुधवारीच माघार घेतल्याने त्यांच्या निर्णयामागे कोणाचा दबाव होता का, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.
या निवडणुकीत शिंदेसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी रिंगणात आहेत, तर भाजपमधील बंडखोर नेते आणि जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या भुतडा मुंबईत तळ ठोकून असून त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणांबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
जर नितीन भुतडा यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आणि त्यांना भाजपमधील काही नेत्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला, तर शिंदेसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यासमोरील समीकरणे गुंतागुंतीची होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत केवळ नगरसेवक मतदान करणार असून एकूण ४४६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महायुतीचे संख्याबळ :
भाजप – १२५
शिंदेसेना – १०७
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – २९
एकूण मते : २६१
महाविकास आघाडीचे संख्याबळ :
काँग्रेस – ९९
शिवसेना (ठाकरे गट) – २३
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ३
एकूण मते : १२५
याशिवाय एमआयएमचे ७, वंचित बहुजन आघाडीचे ५, जनशक्तीचे २० आणि २० अपक्ष नगरसेवकांची मते निर्णायक ठरणार आहेत.
काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या माघारीनंतर काँग्रेस व मविआच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता काँग्रेस व मविआचे नगरसेवक कोणत्या भूमिकेत दिसणार, तसेच मविआ नितीन भुतडा यांना पाठिंबा देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
एकंदरीत, यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतील पुढील राजकीय चित्र गुरुवारी स्पष्ट होणार असून, या निवडणुकीने राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण दिले आहे.