

Vidhan Parishad Election Shiv Sena Candidate
यवतमाळ : अखेरच्या क्षणी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सोमवारी (ता. एक) अखेरच्या दिवशी पाच उमेदवारांनी दहा नामांकन दाखल केले आहे. यात शिंदेसेना, भाजप, काँग्रेस तसेच अपक्षांचा समावेश आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी सुरवातीपासूनच शिंदेसेनेकडून दिलेल्या उमेदवारीला भाजपचा तीव्र विरोध असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा करून शिंदेसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले. राजकीय घडामोडींना वेग आला तो शेवटच्या काही तासांत. पालकमंत्री संजय राठोड यांनी दुष्यंत चतुर्वेदी यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत पक्षात संभ्रमाचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, भाजपकडून नितीन भुतडा यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार किसन वानखेडे, माजी आमदार अॅड. नीलय नाईक, राजू पडगीलवार, प्रकाश पाटील देवसरकर यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. या शक्तिप्रदर्शनाने भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीचे रणांगण सज्ज केले.
यावेळी ज्येष्ठ नेते माणिकाराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीसाठी पाच उमेदवारांनी दहा अर्ज दाखल केले आहे. यात साहेबराव कांबळे यांनी दोन, दुष्यंत चतुर्वेदी तीन, नितीन भुतडा तीन, सैय्यद फारुक तसेच मोहमद साजिद यांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केले आहे.
स्थानिक प्राधिकरण मतदारसंघासाठी महायुती, महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान, प्राप्त अर्जाची छाननी मंगळवारी (ता. दोन) होणार असून, नामांकन मागे घेण्यासाठी गुरुवार (ता. चार) पर्यंत मुदत आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारपर्यंत निवडणुकीची लढत स्पष्ट होईल.