

Worms found in khichdi at a famous hotel in Nanded
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड शहरातील खिचडीसाठी प्रसिद्ध असलेल्या 'हॉटेल मधील खिचडीत आळ्या आढळल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ग्राहकाने खिचडीत आळ्या असल्याचे हॉटेल मालकांच्या निदर्शनास आणून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारामुळे हॉटेलमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हनुमान लाखे यांच्यासह इतर तिघे गुरुवार, दिनांक 11 जून रोजी सकाळच्या सुमारास 'हॉटेल 'मध्ये नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्यांनी खिचडी मागवली असता, त्यामध्ये आळ्या आढळून आल्या. यानंतर लाखे यांनी तातडीने या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केला.
हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या हॉटेलमध्ये नेहमी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा राखला जात असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी असते; मात्र अशा प्रकारे अन्नात आळ्या आढळल्याने शहरभरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Toll F दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून नुकतीच तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. मुंडे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात धडक कारवाया सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत, शहरातील या प्रसिद्ध हॉटेलमधील निष्काळजीपणा समोर आल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.