

Naigaon bulldozer action
नायगाव: नायगाव शहरात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमणांविरुद्ध अखेर नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. सलग चौथ्या दिवशी बुलडोझर कारवाई सुरू राहिल्याने शहरातील बंदिस्त झालेले रस्ते आता मोकळा श्वास घेत आहेत. वाहतूक कोंडी, फूटपाथवरील अडथळे आणि नागरिकांची त्रस्त अवस्था यावर प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे मोहिमेला 'टॉप गिअर' लागल्याचे दिसत आहे.
शनिवारी सुरू झालेली ही मोहीम रविवार आणि सोमवार असे अविरत सुरू राहिली. हेडगेवार चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – नोट्डे हेडगेवार महामार्ग – शेळगाव रोड या संपूर्ण पट्ट्यातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अतिक्रमित बांधकामे काढण्यात आली.
कारवाईत खालील गोष्टींवर बुलडोझर चालवण्यात आला:
फूटपाथवरील बेकायदेशीर दुकाने (गाडे / स्टॉल)
हॉटेलांची अनधिकृत वाढ
चहा-पान स्टॉल
रस्त्यावर अडथळा ठरणारे सिमेंट ब्लॉक आणि रॅक
सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अरुंद झालेल्या रस्त्यांमुळे चारचाकी, मालवाहने आणि पादचारी यांच्यात सतत संघर्षजन्य परिस्थिती निर्माण होत होती. किरकोळ अपघात आणि सततच्या दगदगीमुळे अतिक्रमण हटवणे ही नागरिकांची प्रमुख मागणी बनली होती, ज्यामुळे ही कारवाई अपघाताचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी अपरिहार्य ठरली.
नगरपंचायतीने भाजीबाजारासाठी स्वतंत्र जागा दिली असतानाही काही व्यापारी पुन्हा रस्त्यावर घुसले होते, ज्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास होत होता. 'सूचित करूनही ऐकत नाही तर हटवलेच जाईल,' असा सज्जड दम भरत प्रशासनाने या मनमानीवर कारवाई केली.
या कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी दिवाकर पाटील, नगराध्यक्ष श्रीमती चव्हाण, मुख्याधिकारी गांधारी पवार मॅडम, पोलिस निरीक्षक मारकवाड यांच्यासह संपूर्ण नगर पंचायत व पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. विविध विभागांनी एकत्रित मोहीम राबवल्यामुळे शहरातील घाण, कचरा, अवैध बांधकामे हटवून शहराचे रूप पालटण्यास मदत झाली आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या या कडक भूमिकेचे जोरदार स्वागत केले आहे.“वर्षांनुवर्षे अतिक्रमणाच्या नावाखाली शहर गुदमरले होते; आता रस्ता मोकळा दिसू लागला आहे,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
नवीन पोलिस उपअधीक्षक पानगावकर साहेब आणि मुख्याधिकारी गांधारी पवार यांच्या नेतृत्वाखालील ही मोहीम केवळ 'नव्याचे नऊ दिवस' नसावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच, कच्च्या बांधकामावर कारवाई झाली असली तरी, पक्की बांधकामे कधी हटवणार असा सवालही काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाच्या या आक्रमक मोहिमेमुळे शहरात कायद्याची कडक अंमलबजावणी पुन्हा दिसू लागली असून, पुढील काही दिवसात उरलेले अतिक्रमणही हटवले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यानंतर नागरिकांनी वाहन पार्किंग आणि भाजी मार्केट व्यवस्थेची मागणी केली आहे. रस्त्यावर वाहन पार्किंग तीन दिवस उजवीकडे आणि तीन दिवस डावीकडे असा बदल करावा, तसेच आठवडी भाजी बाजार इतरत्र मार्केट यार्डमध्ये भरवण्याची व्यवस्था करावी, यासाठी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.