

Women sarpanches from Punjab appreciated the architecture of Yergi
देगलूर, पुढारी वृत्तसेवा
पंजाबमधील महिला सरपंचांनी तळेगाव (ता. उमरी) येथील विकासकामांची माहिती घेतल्यानंतर देगलूर तालुक्यातील चालुक्य काळातील येरगी गावास शुक्रवारी भेट दिली. गावातील ऐतिहासिक वारसा आणि प्राचीन स्थापत्य कलेचे पाहुण्यांनी कौतुक केले. दरम्यान, ग्रामपंचायत, बालिका पंचायत राज, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक आणि ग्रामस्थांनी केलेल्या स्वागताने पंजाबमधील सर्व महिला सरपंच व अधिकारी भारावून गेले.
येरगी स्थापत्य कलेचा व विकासाचा अभ्यास करण्यासाठी पंजाब सरकारने पंजाबमधील सरपंच महिला व अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी येरगी गावात दाखल झाले. बालिका पंचायत आणि गावातील महिलांनी गावाच्या प्रवेशद्वारावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत गुलाब आणि इतर फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी केली. या स्वागताने संपूर्ण पाहुणे भारावून गेले होते. तद्नंतर येरगीत पंजाबच्या सर्व महिला सरपंच व पदाधिकारी प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या प्रमुखांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
बालिका पंचायत राज समितीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने संगीतमय लेझीम नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच संगीता पाटील मठवाले, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, सरपंच प्रतिनिधी संतोष पाटील, विस्तार अधिकारी बालाजी उमाटे, दत्तात्रेय कुरुंदे, ग्रामपंचायत अधिकारी राजेश तोटावाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्राम सचिवालयात झालेल्या कार्यक्रमानंतर, पाहुण्यांना गावाची शाळा दाखवण्यात आली जिथे पीपीटीने आजपर्यंत ग्रामपंचायतीने गावात केलेल्या कामांची माहिती दिली.
गावातील स्वच्छता, बालिका पंचायतच्या कामाचे, शाळेचे आणि प्राचीन वास्तुंचे जतन पाहून पंजाबच्या सरपंचांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी मरखेल पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. हुंडेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच आरोग्य विभाग, महावितरण कर्मचारी, कृषी विभाग, तहसील कार्यालय, शाळेतील शिक्षक आणि महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.