

Nagpur Tuljapur Highway work delay
उमरखेड : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील एका त्रस्त युवकाने प्रशासकीय ढिसाळपणावर प्रहार करण्यासाठी संतापाच्या भरात एक आगळेवेगळे पत्र लिहून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नागपूर-तुळजापूर या भव्य महामार्गाचे काम गावाजवळ येताच अचानक का थांबते? आणि तिथेच भीषण अपघातांचे सत्र का सुरू होते?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात विज्ञान आणि प्रशासन दोन्ही अपयशी ठरल्याने आता 'अघोरी' मार्गाचा अवलंब करण्याची वेळ आली असल्याचा उपरोधिक टोला हरीश कामारकर या तरुणाने लगावला आहे.
त्याने थेट राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) अध्यक्षांना पत्र लिहून १६ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्येच्या मुहूर्तावर 'अपघाती भुताचा' बंदोबस्त करण्यासाठी अघोरी पूजा करण्याची परवानगी मागितली आहे.
या पत्रात कामारकर यांनी अत्यंत जळजळीत शब्दांत प्रशासनावर टीका केली आहे. एकविरा देवीच्या फलकाजवळ जिथे हायवे आणि गावचा रस्ता एकत्र येतो, तिथे वारंवार होणाऱ्या अपघातांमागे प्रशासकीय दुर्लक्ष नसून एखादे 'शक्तिशाली भूत' असावे, अशी खात्री गावकऱ्यांना पटली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे भूत इतके प्रभावी आहे की त्याने महामार्ग प्राधिकरणाच्या संपूर्ण यंत्रणेला संमोहित केले आहे. ज्यामुळे त्यांना तिथे सांडणारे रक्त आणि लोकांचा आक्रोश दिसत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, ही पूजा केवळ मांत्रिकाद्वारे न करता महामार्ग प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या हस्तेच पार पाडण्याचा त्यांचा मानस आहे. अधिकाऱ्यांच्या अंगात शिरलेली 'आळसाची बाधा' उतरावी आणि त्यांच्या हातातील फाईल्सवरील अडथळे दूर व्हावेत, यासाठी चक्क फाईल्सवरून लिंबू उतरवण्याचा अजब उपाय त्यांनी सुचवला आहे.
हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, त्यातील उपरोधिक भाषेने प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. जेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जिवंत असूनही सामान्य माणसाच्या मरणाकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा अशा 'चमत्काराची' गरज भासते, असे सांगत कामारकर यांनी व्यवस्थेच्या संवेदनाशून्यतेवर बोट ठेवले आहे. आता या अभिनव पत्राची दखल घेऊन महामार्ग प्राधिकरण रखडलेला बायपास पूर्ण करणार की, हा उपहासही प्रशासनाच्या पचनी पडणार नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संपूर्ण महामार्गावर केवळ हिवरा येथील बायपासचे भिजत घोंगडे : हरीश कामारकर (सामाजिक कार्यकर्ता)
नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाच्या वतीने नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम हाती घेऊन सर्व काम पूर्णत्वास नेले. परंतु, या संपूर्ण महामार्गावर ३५१ किलोमीटर लांबीमध्ये केवळ हिवरा (संगम) येथील बायपासचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने या कामाचे अजुनही भिजत घोंगडे आहे. याला केवळ प्रशासकीय उदासीनता जबाबदार असुन त्यांना याठिकाणी किती बळी घ्यायचे हे मात्र न उलगडणारे कोडे ठरले आहे. भविष्यात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना झाल्यास त्यास सर्वस्वी महामार्ग प्राधिकरणास जबाबदार धरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर लढा देऊ.