

We will take the history of Guru Tegh Bahadur's heroic saga to every household: Chief Minister
नांदेड, पुढारी वृत्तसेवा :
शिखांचे नववे गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हे केवळ शीख समाजापुरते मर्यादित नव्हते, तर ते समस्त मानव जातीच्या आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी होते. औरंगजेबाच्या क्रूर अत्याचाराविरोधात त्यांनी दिलेला लढा आणि त्यांची शौर्यगाथा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नांदेड येथील कौठा भागातील मोदी मैदानावर रविवारी (दि. २५) गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या हिंद-दी-चादर शहीदी समागम सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात जनसमुदायाला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत बाबा कुलवंतसिंघ, संत बाबा बलविंदरसिंघ, संत बाबा हरनामसिंघ यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, मंत्री पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री बाबासाहेब पाटील आणि गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंघ आदी मान्यवर उपस्थित होते.
शीख समाजासोबतच बंजारा, सिंधी, शिकलकरी, वाल्मिकी आणि वारकरी हा 'नानक नामलेवा' समाज देशभरात विखुरलेला आहे. या सर्व समाजांना एकत्रित आणून गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास गावागावांत आणि वस्त्यावस्त्यांत पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर आणि नांदेडनंतर आता नवी मुंबई येथेही 'हिंद-दी-चादर' समागम होणार असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी चोख नियोजन केले होते. दरम्यान, या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार होते, मात्र अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याने ते येऊ शकले नाहीत.
धर्मांतरासाठी अत्याचार, तरीही गुरु डगमगले नाहीत
इतिहासाचा दाखला देताना मुख्यमंत्री म्हणाले, औरंगजेबाने सनातन धर्म रक्षक आणि काश्मीरी पंडितांवर अनन्वित अत्याचार केले. या अन्यायाचा बिमोड करण्यासाठी गुरु तेग बहादूर यांनी रणशिंग फुंकले. औरंगजेबाने गुरुजींना कैद करून त्यांच्यावर धर्मांतरासाठी अमानुष अत्याचार केले, मात्र गुरुजींनी सनातन धर्माच्या रक्षणाचा संकल्प सोडला नाही. त्यांनी प्राणांचे बलिदान दिले, पण तत्त्व सोडले नाही. त्यांचे सुपुत्र गुरु गोविंदसिंघजी यांच्या चार मुलांचीही निर्दयीपणे हत्या करण्यात आली. हा त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास विसरता येणार नाही.