

उमरी : उमरी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर शुक्रवारी (दि. २३) रात्री आढळून आलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. हा मृत तरुण नायगाव तालुक्यातील माळी ईकळी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून, भास्कर बापूराव सूर्यवंशी (वय ३३ वर्षे) असे त्याचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उमरी रेल्वे स्थानकावरील फलाटावर एक तरुण मृतावस्थेत आढळला होता. या घटनेची माहिती मिळताच नांदेड रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रयत्नांना यश येऊन रविवारी संबंधित तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर सूर्यवंशी याचा मृत्यू कदाचित एखाद्या दीर्घ आजारामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
रविवारी दुपारी उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तपासी अंमलदार तथा नांदेड रेल्वे पोलीस हवालदार संदीप पोपलवार यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी नांदेड रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू (क्र. ०४/२०२६ कलम १९४ नुसार) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.