

Two boats involved in illegal sand mining were destroyed
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा खडकपूर्णा जलाशयात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या दोन बोटी जप्त करून नष्ट करण्यात आल्या. ही कारवाई महसूल व पोलिस विभागाच्यावतीने करण्यात आली. यामुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
महसूल व पोलिस गस्तीवर असलेल्या पथकाला सिनगाव जहागीर हद्दीत, गट नंबर ३४१, खल्लाळ गव्हाण रस्ता परिसरातील खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली.
पथकाने कारवाई करत एक मोठी फायबर बोट व एक लहान इंजिन बोट ताब्यात घेतली. बोटी किनाऱ्यालगत सुरक्षित ठिकाणी आणून जप्त करून नष्ट करण्यात आल्या. वाहने, बोटी, इंजिन्स कायमस्वरूपी जप्त करण्यात आल्या आहेत. बोटीवर काम करणारे परप्रांतीय मजूर पळून गेले.
घटनास्थळी एक आधार कार्ड सापडल्याने पुढील कारवाईसाठी ते पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रेती उपशासाठी वापरलेले सर्व साहित्य नष्ट करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळाधिकारी विजय हिरवे (मेहुणा राजा), महसूल सहायक उमेश गरकल, प्रशांत वाघ, ग्राम महसूल अधिकारी संजय हांडे, आकाश खरात, सरिता वाघ, तेजस शेटे, पोलिस कॉन्स्टेबल माधव कुटे, कलीम देशमुख, शिपाई ताठे, महसूल सेवक वैशाली देशमाने, मारुती बंगाळे आदी उपस्थित होते.
यंदा देऊळगाव राजा तालुक्यात अनेक वेळा कारवाया झाल्या आहेत. मात्र, रेतीमाफिया काही दिवस थांबून पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र वारंवार दिसते. कारवाईनंतर एक-दोन दिवसांतच 'जैसे थे तैसे' स्थिती निर्माण होते.
यावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. रेतीचा तळ तयार करण्यासाठी केलेले खड्डे बुजवून उद्ध्वस्त करण्यात आले. अवैध वाहतुकीसाठी वापरले जाणारे रस्ते तोडण्यात आले. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.