

नांदेड : भारतीय जनता पार्टीला राज्यातील पहिले नगराध्यक्षपद नांदेड जिल्ह्यातील मुदखेड नगर परिषदेच्या माध्यमातून १९८५ साली प्राप्त झाले होते. त्यानंतर ४० वर्षांनी या पक्षाला नांदेड महानगरपालिकेचे महापौरपद येत्या १० फेब्रुवारीला मिळणार आहे. नांदेड न.पा. ते नांदेड मनपा या प्रवासाच्या अमृतमहोत्सवी वर्षात या पक्षाची नगरसेविका वरील पदावर विराजमान होईल.
नांदेड-वाघाळा मनपाची स्थापना १९९६ साली झाल्यानंतर १९९७साली पहिल्या महापौराचा मान शिव-सेनेला मिळाला होता. नंतरची २४ वर्षे या मनपामध्ये काँग्रेसचेच पर्व राहिले. मनपाच्या स्थापनेपूर्वी जिल्ह्यात भाजपाला मुदखेड शहरात रामराव चौधरी यांच्या रूपाने दीर्घकालीन नगराध्यक्ष लाभला. पण चौधरी आता भाजपापासून दुरावले असले, तरी या पक्षाच्या इतिहासात 'भाजपाचे राज्यातील पहिले नगराध्यक्ष' अशी नोंद त्यांच्या नावे झाली.
नांदेड मनपाच्या १९९७ ते २०१७ या कालावधीत झालेल्या ५ निवडणुकांत भाजपा लढली; पण या पक्षाला कधीही दोन आकडी संख्येत नगरसेवक निवडून आणता आले नाहीत. तसेच नगर परिषदेच्या ४४ वर्षाच्या कालखंडात या पक्षाला एकदाही नगराध्यक्षपदाचा मान मिळाला नाही. २०२६ हे वर्ष मात्र या पक्षासाठी नदिडमध्ये भाग्याचे ठरले. मनपा निवडणुकीपूर्वी निवडणुकीत या पक्षाला मुदखेडसह अन्य दोन ठिकाणची नगराध्यक्षपदे मिळाली. त्यानंतर 'नांदेड न.प. ते नांदेड-वाघाळा मनपा' या प्रवासाचे ७५वे (अमृतमहोत्सवी) वर्ष आता सुरू असताना महापौरपदी भाजपाची महिला विराजमान होणार, हे आजच नक्की झाले आहे.
विभागीय आयुक्तांनी महापौर आणि उपमहापौर निवडीच्या विशेष सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती ज्या दिवशी झाली, त्याचदिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे सर्वच पक्षांचे राजकीय व्यवहार थांबले; पण तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर आता घडामोडी सुरू झाल्या आहेत.
नांदेड मनपाच्या ८१ सदस्यांत भाजपा नगरसेवकांची संख्या ४५ आहे. या पक्षाला हे स्पष्ट बहुमताचे संख्याबळ मिळवून देणारे स्थानिक नेते, खा. अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या महापौरपदी कोणाला विराजमान करावे, याबद्दलची जुळवाजुळव सुरू केली असल्याचे सांगितले जाते. हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून भाजपाकडे या प्रवर्गाच्या १२ महिला असल्यामुळे त्यांच्यातून कोणाची निवड करावी, हा नेत्यांपुढील जटिल प्रश्न आहे.
खा. चव्हाण शुक्रवारी मुंबईमध्ये होते. त्यांच्या भाजपा प्रवेशाला येत्या १४ फेब्रुवारीस दोन वर्षे पूर्ण होतील. त्यापूर्वीच आपल्या या पक्षाला 'महापौरपदाची भेट' देण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली असून मनपातील भव्य यशामुळे त्यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे. नांदेडचा महापौर कोण असावा, हे एरवी पक्षाच्या नेत्यांनी ठरवले असते; पण नांदेडमध्ये चव्हाण यांचा कल पाहूनच महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव नक्की होईल, असे मानले जाते.