Umarkhed post office relocation delay |देखणी नवी इमारत तयार; उमरखेड पोस्ट ऑफिसचे स्थलांतर रखडले!

वृद्ध, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय कायम; ३३ पायऱ्या चढून टपाल कार्यालय गाठण्याची वेळ
पोस्टाची आधुनिक इमारत. इन्सेटमध्ये याच जुन्या भाड्याच्या इमारतीतून पोस्टाचे काम सुरू आहे.
पोस्टाची आधुनिक इमारत. इन्सेटमध्ये याच जुन्या भाड्याच्या इमारतीतून पोस्टाचे काम सुरू आहे.Pudhari photo
Published on: 
Updated on: 

उमरखेड : उमरखेड येथील इंग्रजकालीन जुन्या टपाल कार्यालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त नवीन इमारत उभारावी, यासाठी स्थानिक पत्रकारांसह ग्राहकांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश येऊन सुमारे दोन वर्षांपूर्वी टपाल विभागाची देखणी, अद्ययावत आणि कॉर्पोरेट लूक असलेली नवीन इमारत उभी राहिली. मात्र, इमारत पूर्ण होऊनही प्रत्यक्ष टपाल कार्यालयाचा कारभार अद्याप जुन्याच भाड्याच्या इमारतीतून सुरू असल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे.

नवीन इमारतीत टपाल कार्यालय कधी सुरू होणार, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. उमरखेड शहरातील टपाल कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे केंद्र आहे. बचत खाते, आवर्ती ठेव, विविध अल्पबचत योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, टपाल विमा, पार्सल आणि पत्रव्यवहार अशा विविध कामांसाठी नागरिकांना येथे जावे लागते.

विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध नागरिकांची टपाल कार्यालयात नियमित ये-जा असते. मात्र, सध्या ढाणकी रोडवरील भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना जवळपास ३३ पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे वयोवृद्ध, आजारी व्यक्ती आणि पायऱ्या चढण्यास त्रास होणाऱ्या नागरिकांसाठी ही बाब गैरसोयीची ठरत आहे.

विशेष म्हणजे, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागते. अशा वेळी पायऱ्या चढताना होणारा त्रास, वयोमानानुसार कमी झालेली शारीरिक क्षमता आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता, टपाल कार्यालयाची सध्याची जागा नागरिकांसाठी कितपत सोयीची आहे, हा प्रश्न उपस्थित होतो. आधुनिक काळात शासकीय कार्यालये अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर दिला जात असताना उमरखेडमधील टपाल कार्यालयाची परिस्थिती मात्र वेगळे चित्र दाखवित आहे.

जुन्या इमारतीऐवजी आधुनिक इमारत उभी राहिल्याने नागरिकांच्या गैरसोयी दूर होतील, कामकाज अधिक सुलभ होईल आणि टपाल विभागाला आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, इमारत पूर्ण होऊनही तिचा प्रत्यक्ष वापर सुरू न झाल्याने या अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही कार्यालयाचे स्थलांतर का रखडले आहे, उद्घाटनासाठी कोणत्या प्रशासकीय प्रक्रिया प्रलंबित आहेत आणि प्रत्यक्ष कामकाज सुरू करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आहे, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे.

पोस्टाची आधुनिक इमारत. इन्सेटमध्ये याच जुन्या भाड्याच्या इमारतीतून पोस्टाचे काम सुरू आहे.
Nanded Crime | नांदेड : दोन घरफोड्यांचा उलगडा, एकास रंगेहाथ पकडले

नवीन इमारत उभारणे हा विकासाचा एक टप्पा असला, तरी त्या इमारतीत प्रत्यक्ष सेवा सुरू होणे हेच त्या विकासाचे खरे फलित आहे. त्यामुळे टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून स्थलांतरातील अडचणी दूर कराव्यात आणि नवीन इमारतीतून टपाल कार्यालयाचा कारभार लवकरात लवकर सुरू करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पोस्टाची आधुनिक इमारत. इन्सेटमध्ये याच जुन्या भाड्याच्या इमारतीतून पोस्टाचे काम सुरू आहे.
Nanded Crime : नांदेड परिक्षेत्रात २२२ गुन्हे दाखल, ३.३१ कोटींचा ऐवज हस्तगत!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news