

Two killed in bus-bike collision
देगलूर, पुढारी वृत्तसेवा : हणेगाव येथून उदगीरकडे जाणारी बस व कामाजीवाडी येथून हणेगावकडे येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दोघांचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी झाल्याची घटना हणेगावजवळ शनिवारी (दि.१२) सकाळी ११ च्या सुमारास घडली.
उदगीर प्राप्त माहितीनुसार, आगाराची बस (क्र. एम.एच.२०, बीएल १९८३) ही हणेगाव येथून प्रवासी घेऊन वझरमार्गे उदगीरकडे जात होती. हणेगाव ते औराद वळण रस्त्यावर कामाजीवाडी येथून हणेगावला येणाऱ्या दुचाकीची (क्र. एम. एच. २६ एपी १३७) समोरासमोर धडक झाली.
यात दुचाकीवरील सोपान लक्ष्मण बिरादार (वय ६५, रा. कुडली), नरसिंगराव पाटील (वय ७५), दुचाकीचालक वामनराव नारायणराव बिरादार (वय ६५, दोघे रा. कामाजीवाडी ता. देगलूर) हे गंभीर जखमी झाले. तर दुचाकीवरील तीन वर्षीय शिवानी संदीप बिरादार (रा. कामाजीवाडी) ही किरकोळ जखमी झाली.
दरम्यान गंभीर जखमी अवस्थेतील सोपान बिरादार, नरसिंगराव पाटील यांना उपचारासाठी बिदर इंस्टीटुड ऑफ मेडिकल साईन्स गव्हरमेंट हॉस्पीटल (कर्नाटक) याठिकाणी हलविण्यात आले होते. परंतु या दोघांचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह मरखेल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. सदर वृत्त लिहिपर्यंत अद्याप मरखेल पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.