

Bamboo training center at Narwat not operational
भोकर, पुढारी वृत्तसेवा बांबू व्यवसायाला चालना मिळावी यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नारवट येथे बांबू प्रशिक्षण केंद्र मंजूर करून आणले खरे; पण हे बांबू प्रशिक्षण केंद्र मागील चार वर्षांपासून धूळखात पडले आहे. बांबूपासून वस्तू बनविण्यासाठी अद्यापपर्यंत प्रशिक्षणार्थी उपलब्ध झाले नसल्याने करोडो रुपयांची मशीन धूळखात पडल्या आहेत.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने भोकर तालुक्यातील बांबूचा व्यवसाय करणाऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे व दर्जेदार बांबू उपलब्ध व्हावा यासाठी सन २०२० मध्ये नारवट येथे बांबू प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाली. बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी लागणारे मशीनही उपलब्ध करण्यात आले.
पण भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध नाहीत. यामुळे वनपरिक्षेत्र कार्यालयाने भोकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांबू उपलब्ध व्हावा यासाठी शेतकऱ्यांना बांबू शेतीचे महत्त्व पटवून दिले असल्याने या शेतीकडे अनेक शेतकरी वळले होते.
पण अनुदान मिळविण्यासाठी असलेली उदासीनता ही शेती फुलण्यापासून वंचित राहत आहे. या बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी वन विभागकडून नारवट येथील १८ हेक्टरमध्ये १४ प्रकारच्या बांबू प्रजातीची लागवड केली. हे बांबू आता पोक्त होत असून यापासून अनेक वस्तू बनवता येऊ शकतात. पण वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बांबूपासून वस्तू बनविण्याचे काम सुरू झाले नाही.
बांबू प्रशिक्षण केंद्रात मशीनवर काम करावे लागते. हे मशीन चालविण्यासाठी प्रशिक्षणार्थी गरज आहे. या बांबू प्रशिक्षण केंद्रात अद्यापपर्यंत प्रशिक्षण देण्यासाठी कोणीही उपलब्ध झाले नाही. बांबू आहेत, मशीन आहेत केवळ प्रशिक्षणार्थी उपलब्ध होत नाहीत या कारणाने मागील पाच वर्षापासून लाखो रुपयांच्या मशीनला गंज चढत आहे.