

Two Bengal monitor seized in Kakandi area
नांदेड, पुढारी वृत्तसेवा
तितर, घोरपड, ससा या सारख्या वन्य प्राण्यांना पाळणे हा गुन्हा असताना वन विभागाच्या दुर्लक्षामुळे या सारख्या असंख्य प्राण्यांचा बळी देत आहारासाठी वापर केला जात आहे. सोमवारी सिडको पोलिसांनी एका इसमाकडून दोन जिवंत घोरपड जप्त केल्या.
नांदेड जिल्ह्याला किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर या तालुक्यात मोठे वन परिक्षेत्र आहे. येथील जंगलात विविध हिस्स्र प्राण्यांसह काही पशुपक्षांचाही वावर आहे. किनवट व परिसरात रानडुक्कर, हरीण या सारख्या प्राण्यांची उघडपणे कत्तल होते. पण वनविभागाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. अलिकडच्या काळात अशा प्राणी तस्करांविरुद्ध वनविभागाने कोणतीही मोठी कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही.
ग्रामीण भागातल्या या प्रकाराचे या लोण आता शहर व परिसरातही दिसून येत आहे. तितर, ससा, घोरपड या सारखे प्राणी बाळगणे त्यांची हत्या करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे राज्य शासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असले तरीही खाद्य शौकिन मात्र जादा दराने खरेदी करून एक प्रकारे पाठबळ देत आहेत. शहरालगतच्या अनेक भागावर मटन, चिकन, मासे यासह तितर, घोरपड यासारख्या विशेष विनासायास उपलब्ध होत असल्याचे सांगण्यात आले. मुखेड तालुक्यात तर एक धावा केवळ तितर शौकिनांसाठी प्रसिद्ध आहे.
एका गुप्त खब-याने दिलेल्या माहितीनंतर सिडकोचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने काकांडी परिसरात छापा टाकून दशरथ यलप्पा धोतरे (वय २७) याला अटक करत पाच किलो प्रत्येकी पाच किलो वजनाच्या दोन घोरपडी जप्त केल्या. तस्करी करण्याच्या उद्देशानेच आपण या घोरपडी आणल्या होत्या, असे त्यांनी पोलिस जबाबात स्पष्ट केले आहे.