

नांदेड : मुखेड-कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना फोनवरून खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला नागपूर येथून २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे. बाळासाहेब भास्कर राख (वय २४, मूळ रा. ढाकलगाव, ता. अंबड, जि. जालना; सध्या रा. हसनबाग, नंदनवन, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील चार दिवसांत नेत्यांना धमक्या येण्याची ही दुसरी मोठी घटना असल्याने संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास आमदार तुषार राठोड हे मुखेडहून नांदेडकडे प्रवास करत होते. त्यादरम्यान अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांच्या फोनवर संपर्क साधून खंडणीची मागणी करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
या प्रकरणी आमदार राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांना आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी उपनिरीक्षक महेश कोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपी नागपूर येथील हसनबाग-नंदनवन परिसरात असल्याची माहिती मिळाली. एलसीबीच्या पथकाने तत्काळ नागपूर गाठून सापळा रचला आणि आरोपी बाळासाहेब राख याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.