Raigad Deepotsav: पणत्यांच्या प्रकाशात उजळली स्वराज्याची राजधानी; किल्ले रायगडावर दीपोत्सवाचा दिमाखदार सोहळा

हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Raigad Deepotsav
Raigad DeepotsavFile Photo
Published on: 
Updated on: 

Raigad Deepotsav

नाते : इलियास ढोकले

एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, दुसरीकडे हातात प्रज्वलित मशाली आणि गडाच्या पायऱ्यांवर लुकलुकणाऱ्या हजारो पणत्या... अशा भारावून टाकणाऱ्या वातावरणात हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवाने रायगडाच्या ऐतिहासिक वैभवात रोषणाईची अनोखी भर घातली.

जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांच्या हस्ते किल्ल्याचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दीपोत्सवाला सुरुवात झाली. रायगडाच्या चित्त दरवाजा परिसरात गडाच्या पायऱ्यांवर पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. तसेच मशालींच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. या दृश्याने उपस्थित शिवप्रेमी भारावून गेले.

Raigad Deepotsav
Raigad Hydroelectric Power History: विज निर्मितीत रायगड जिल्ह्याची १११ वर्षांची यशस्वी वाटचाल

दीपोत्सवाच्या निमित्ताने शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले. फटाक्यांच्या आतषबाजीने आकाशात रंगांची उधळण झाली, तर शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गडाच्या पायऱ्यांवर लावलेल्या पणत्यांची मनमोहक रोषणाई आणि मशालींचा प्रकाश यामुळे रायगडाचे विहंगम दृश्य अनुभवायला मिळाले.

रायगड हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून प्रत्येक शिवप्रेमीच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा मानबिंदू आहे. या गडावर दीपोत्सव साजरा करताना शिवरायांच्या स्वराज्याची आठवण आणि इतिहासाबद्दलची आस्था नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

मावळा प्रतिष्ठानच्या आयोजनातून पार पडलेल्या या दीपोत्सवाने रायगडच्या ऐतिहासिक भूमीवर शिवप्रेमाचा जागर घडवून आणला. पणत्यांच्या प्रकाशात उजळलेला रायगड आणि शिवरायांच्या जयघोषात साजरा झालेला हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

Raigad Deepotsav
Raigad Mango Cashew Production: पोषक थंडीमुळे रायगडमध्ये आंबा-काजू पिक बहरणार; बागायतदारांच्या आशा पल्लवित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.