

Painganga tigress train accident
उमरखेड : किनवट तालुक्यातील शनिवार पेठ, मदनापूर, दाभाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेल्या पट्टेदार वाघिणीचा शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी पहाटे मदनापूरनजीक रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला. ही वाघीण पैनगंगा अभयारण्यातीलच असल्याची पुष्टी खरबी वनपरिक्षेत्राधिकारी सोळंके यांनी केली. काही महिन्यांपूर्वी ताडोबा अभयारण्यातून पैनगंगा अभयारण्यात आणलेल्या या वाघिणीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, पैनगंगा अभयारण्यात वाघांची आणखी एक जोडी असून ती सुरक्षित आहे. या वाघांच्या हालचालींवर वनविभागाकडून व्यवस्थित निगराणी ठेवण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी सोळंके यांनी दिली. किनवट तालुक्यातील शनिवार पेठ परिसरात १ ऑक्टोबर रोजी शेतात चरणाऱ्या एका बैलावर वाघिणीने हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना घडली होती.
त्यानंतर शनिवार पेठ, मदनापूर, दाभाडी आणि दरसांगी परिसरात वाघिणीच्या वावरामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनाही सावधगिरी बाळगावी लागत होती. या पार्श्वभूमीवर वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत होती. वनविभागाने परिसरात छुपे कॅमेरे लावून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.
मात्र, शनिवारी पहाटे मदनापूरनजीक रेल्वे रुळावर वाघिणीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. रेल्वेच्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच किनवट व बोधडी वनविभागासह खरबी येथील पैनगंगा अभयारण्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत वाघिणीच्या मृत्यूमागील परिस्थितीचा तपास सुरू करण्यात आला असून, पुढील कार्यवाही वनविभागाकडून करण्यात येत आहे.
ताडोबा अभयारण्यातून पैनगंगा अभयारण्यात आणलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या स्थलांतरानंतर त्यांच्या सुरक्षिततेचा आणि अधिवासातील हालचालींच्या देखरेखीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मृत वाघीण पैनगंगा अभयारण्यातून बाहेर पडून रेल्वे रुळापर्यंत कशी पोहोचली, तिच्या हालचालींचा मागोवा घेतला जात होता का? आणि अपघात नेमका कसा घडला, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे आवश्यक आहे.