

बिलोली : देगलूर तालुक्यातील आलूर येथे तीन वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला बिलोली येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 20 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावासाची तरतूद निकालात करण्यात आली आहे. न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी बुधवारी (दि. 17) हा निकाल दिला.
गणेश होटलप्पा ऊर्फ प्रभाकर पडमपल्ले (वय 20, रा. आलूर, ता. देगलूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. देगलूर तालुक्यातील आलूर येथे 13 जून 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. एम. शिंगाडे यांनी पोक्सो अंतर्गत आरोपीविरुद्ध अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय 1, बिलोली येथे दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारतर्फे एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबानुसार आरोपीवर गुन्हा सिद्ध झाला.
सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी आरोपीला 5 वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता संदीप भीमराव कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. जयेश संदीप अग्रवाल, ॲड. योगेश सतीश पुंड आणि पैरवी कर्मचारी सी. बी. पांढरे यांनी सहकार्य केले.