

हिंगोली : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय राजीव सातव यांच्या पत्नी, विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. हा प्रवेश निश्चित मानला जात असून तसे झाल्यास हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसणार आहे.
आ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या काही मोजक्या आणि विश्वासू कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचा निरोप पाठवला आहे. त्यानुसार बुधवारी अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच अधिकृत प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या या सर्व हालचालींबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात असून, कोणत्याही क्षणी हा पक्षप्रवेश होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
काँग्रेसला 4 महिन्यांत मोठे भगदाड
हिंगोली जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र गेल्या चार महिन्यांत येथील राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. सर्वप्रथम माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे सेनेत प्रवेश केला. यामुळे सेनगाव आणि हिंगोली तालुक्यात पक्षाला फटका बसला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात आणि काहींनी शिंदे सेनेत प्रवेश केला. आता खुद्द राजीव सातव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेससमोर मोठे अस्तित्व संकट उभे राहिले आहे.
राजीव सातव यांचा वारसा आणि भाजप प्रवेश
दिवंगत राजीव सातव हे 2014 ते 2019 या काळात हिंगोलीचे खासदार होते. राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. 2021 मध्ये त्यांच्या आकस्मिक निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना राजकारणात संधी दिली. 2021 च्या पोटनिवडणुकीत त्या बिनविरोध निवडून आल्या, तर 2024 मध्ये पुन्हा त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे. सध्या त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षही आहेत. असे असतानाही त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.