

जालना : धनगर समाजातील अल्पउत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे निवासी इंग्रजी शिक्षण देणाऱ्या योजनेत काही संस्थाचालकांनी गैरप्रकार करून कोट्यवधींचे अनुदान लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जिल्ह्यातील काही शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर जालना येथील इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात बुधवारी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात पालकांनी त्यांच्या पाल्यांसह मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विभागाच्या सहायक संचालकांना धारेवर धरत समायोजनाला तीव्र विरोध केला. यावेळी विद्यार्थ्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.त्यानंतर जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यानी तीन तास ठिय्या आंदोलन करीत समायोजनास विरोध केला.
धनगर समाजातील अल्पउत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे निवासी इंग्रजी शिक्षण देणाऱ्या योजनेत काही संस्थाचालकांनी गैरप्रकार करून कोट्यवधींचे अनुदान लाटले. दरम्यान, यानंतर जालना जिल्ह्यातील काही शाळांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार असतांनाच या समायोजनाला पालक व विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध करीत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले.
धनगर समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे निवासी इंग्रजी शिक्षण देणारी योजना इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने सुरू केलेली आहे. या योजनेतील काही निवासी शाळांनी नियमांचे पालन न करता शासनाची फसवणूक करून कोट्यवधींचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर या शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी बुधवारी जालना येथील इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयात पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, यावेळी पालकांनी त्यांच्या पाल्यांसह मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विभागाच्या सहायक संचालकांना धारेवर धरले.
यावेळी इतर शाळांमधे समायोजनाला तीव्र विरोध करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देखील सभागृहात जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. याठिकाणी प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. आमचे पाल्ये ज्या निवासी शाळेत शिक्षण घेत आहे, त्याच शाळेत त्यांना शिक्षण द्या, अशी आग्रही मागणी पालकांनी, विद्यार्थ्यांनी लावून धरली. समाजकल्याण कार्यालयात यावर काही तोडगा न निघाल्यामुळे पालक - विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारात विद्यार्थी - पालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी माजीमंत्री राजेश टोपे यांनी मध्यस्थी करून निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अनंत कदम यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी फोनवरून संवाद साधण्यात आला.
माजी आ.राजेश टोपे यांच्याशी बोलतांना मंत्री अतुल सावे यांनी याबाबत आठ दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही आंदोलक मागे हटले नाही. अखेर सहाय्यक संचालकांनी याबाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल तीन तास चाललेल्या आंदोलनामुळे पोलिसांच्या विशेष तुकडीला देखील पाचारण करण्यात आले होते.